वेगवेगळ्या अपघातांत तीन जणांचा मृत्यू; शिरपूर आणि साक्री तालुक्यांतील तीन घटना
By देवेंद्र पाठक | Published: May 21, 2023 06:50 PM2023-05-21T18:50:24+5:302023-05-21T18:51:55+5:30
पोलिसात गुन्हा.
देवेंद्र पाठक, धुळे : साक्री तालुक्यात दोन आणि शिरपूर तालुक्यात एक अशा तीन अपघातांच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. शिरपूर तालुक्यातील दहिवद सेंधव्याकडून शिरपूरच्या दिशेने जीजे ०५ जेएफ २८६९ क्रमांकाचे वाहन येत असताना, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दहिवद फाट्याजवळ उलटले. अपघाताची ही घटना मंगळवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली. यात विपीन मोंगीलाल तांबोळी (वय ५२, रा.नंदुरबार) आणि जमीर जाकीर शेख (रा.नंदुरबार) या दोघांना गंभीर दुखापत झाली. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना विपीन तांबोळी यांचा मृत्यू झाला. शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला.
शेवाळी ता.साक्री येथील घटना
नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर साक्री तालुक्यातील शेवाळी गावानजीक नवीन बायपासजवळ एमएच ०१ बीएफ ०३३२ क्रमांकाची कार आणि एमएच १८ बीएस २५४२ क्रमांकाची दुचाकी यांच्यात अपघात झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात सुकलाल निंबा गवळी (वय ५६, रा.दातर्ती ता.साक्री) यांना गंभीर दुखापत झाली. तातडीने रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले. साक्री पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद शनिवारी करण्यात आली.
विटाई ता.साक्री येथील घटना
साक्री तालुक्यातील विटाई ते बेहेड या दरम्यान शिवाजी पुंजाराम खैरनार यांच्या शेताजवळ एमएच १८ एजे २६७७ क्रमांकाची कार आणि एमएच १८ एके ३५९२ क्रमांकाची दुचाकी यांच्यात अपघात झाला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात विजय आप्पाजी खैरनार (वय २१, रा.विटाई ता.साक्री) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. साक्री पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी अपघाताची नोंद करण्यात आली.