न्यायाधिशांच्या घरावर दगडफेक व जाळपोळप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:24 PM2019-03-12T23:24:11+5:302019-03-12T23:25:20+5:30
एक ताब्यात, दोघांचा शोध सुरुच
दोंडाईचा : येथील दिवाणी न्यायाधीश व तत्कालीन न्यायाधीश यांच्या घरावर दगडफेक व न्यायाधीशांची कार समजून वाहन जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन संशयितांविरोधात दोंडाईचा पोलिसात जाळपोळ, दगडफेक, शिवीगाळ व नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे दोंडाईच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोंडाईचा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शासकीय निवासस्थानात न्या.आण्णासाहेब गिºहे वास्तव्यास आहेत. सोमवारी संध्याकाळी दोंडाईचा पोलिसात काही गुन्हे दाखल असलेल्या तीन जणांनी न्या.गिºहे यांची कार समजून एम.एच. १५ बी. ई.बी. ४९२३ क्रमांकाच्या वाहनाला जाळण्याचा प्रयत्न केला.
तसेच घरावर दगडफेक करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतू ती कार चंद्रसिंग नारायणसिंग राजपूत यांची होती. त्यांनी सावलीसाठी झाडाच्या आडोशाखाली ही कार उभी केलेली होती. मात्र, जळत असलेली कार न्यायाधिशांची नसून दुसऱ्याची असल्याचे लक्षात आल्यावर हल्लेखोरांनी तत्कालीन न्यायाधिश संतोष गरड यांचे निवासस्थानाकडे मोर्चा वळविला. जनता कॉलनीतील भाडेतत्वावर घेतलेल्या घरात हे न्यायाधिश वास्तव्यास असून सध्या धुळे येथे कार्यरत आहेत. मुलाचे शिक्षण सुरु असल्याने ते येथून ये- जा करतात. हल्लेखोरांकडून त्यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला. तसेच घरावर दगडफेक करण्यात आली. त्यात खिडक्याची काचे फुटली. वॉल कंपाऊंडचे नुकसान करण्यात आले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, हल्लेखोरांचा प्रतिकार करण्यासाठी काहींनी हल्लेखोरांना मारहाण केली. त्यात दोन हल्लेखोर फरार झाले. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित विक्की उर्फ विवेक अजय निकवाडे यास ताब्यात घेतले आहे. मारुती कार जाळण्याचा प्रयत्न व दगडफेक केल्याप्रकरणी कार मालक चंद्रसिंग नारायणसिंग राजपूत यांच्या फिर्यादीनुसार विक्की निकवाडे, यशोदिप गीते, बॉबी यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दोन्ही न्यायाधीश अन्य गुन्हा दाखल करणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
विक्की निकवाडे पोलिसांच्या ताब्यात असून अन्य दोन फरार आहेत. फरार संशयितांना ताब्यात घेण्यास पोलिसांना अजून यश आलेले नाही. दरम्यान, अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्या.अण्णासाहेब गिºहे यांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.