गळफास घेऊन तिघांची आत्महत्या, धुळे जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या घटना
By देवेंद्र पाठक | Published: September 14, 2023 04:39 PM2023-09-14T16:39:15+5:302023-09-14T16:39:46+5:30
पोलिसात गुन्हा दाखल
देवेंद्र पाठक, धुळे : तालुक्यातील कापडणे, शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा आणि साक्री तालुक्यातील बोपखेल येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या घटनेत तीन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. याप्रकरणी पोलिसात ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकलेले नाही.
कापडणे गावातील घटना
धुळे तालुक्यातील कापडणे येथील राहुल अशाेक पाटील (वय ३०) या तरुणाने त्याच्या राहत्या घरातील छताच्या लाकडी कड्याला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. घटना लक्षात येताच त्याला लोकांच्या मदतीने खाली उतरवून सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. सोनगीर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र वानखेडे घटनेचा तपास करत आहेत.
वालखेडा येथील घटना
शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथे राहणारा नितीन संभाजी पाटील (वय ३५, मूळ रहिवासी बुधगाव, ता. चोपडा) या तरुणाने वालखेडा गावातील बसस्टँडजवळ कंचनपूर रोडवरील राहत्या घरात पंख्याला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. त्याला नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. नरडाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस उपनिरीक्षक गोटीराम पावरा घटनेचा तपास करीत आहेत.
बोपखेल येथील घटना
साक्री तालुक्यातील बोपखेल येथील दिलीप रामदास अहिरराव (वय ६०) या वृध्दाने सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. घटना लक्षात येताच त्यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. पोलिस हेड कॉन्स्टेबल पी. यू. सोनवणे घटनेचा तपास करत आहेत.