मालपूरसह परिसरात यंदा ओल्या दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 10:06 PM2019-09-20T22:06:44+5:302019-09-20T22:07:21+5:30
बळीराजा हवालदिल : सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून पिके वाया जाण्याची भीती
मालपूर : मालपूरसह संपूर्ण शिंदखेडा तालुक्यावर यावर्षी देखील दुष्काळाचे सावट कायम आहे. मात्र, कोरड्या दुष्काळाऐवजी यंदा ओल्या दुष्काळाची भिती शेतकऱ्यांना सतावत आहे. डोंगर दºयातून पाणी पाझरत असल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली येत आहे. तसेच दररोज पावसाची हजेरी लागत असल्यामुळे बाजरी, ज्वारी, मका हे संपूर्ण पिकच वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे.
शिंदखेडा तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक यावर्षी देखील कायम राहिल. मात्र, कोरडा ऐवजी ओला दुष्काळाचा सामना करावा लागेल, अशी मालपूरसह तालुक्यातील शेतकºयांमध्ये भीती व्यक्त होत आहे.
मृग, आर्द्रा हे पाण्याचे नक्षत्र सुरुवातीला कोरडे गेल्यामुळे आणि गेल्या तीन-चार वर्षाचा अनुभव लक्षात घेता पोळा सणानंतर पाऊस होत नसल्यामुळे येथील शेतकºयांनी कमी पाण्यात येणारे बाजरी, ज्वारी, मका, मुग आदी पिकांना पसंती देऊन शेतशिवारात पेरा केला. मात्र, पेरलेला दाणा भरलेले कणिस घेऊन आला असताना येथे दररोज पाऊस होत असल्यामुळे ही संपूर्ण पिकेच वाया गेल्यात जमा होत आहेत. म्हणून येथे ओल्या दुष्काळाची भिती निर्माण झाली आहे.
बाजरी, पिक कणसात दाणा भरुन तयार झाले आहे. पावसाची उघडीप होताच या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र, सायंकाळी पावसासह जोरदार वारा येत असल्यामुळे हे पीक आडवे पडून नष्ट होतांना दिसून येत आहे. काही शेतात जमिनीवर पाणी असल्यामुळे ते मुळासकट वर येत असल्यामुळे पाऊस असाच होत राहिल्यास एक दाणा देखील शेतकºयांच्या हाती लागणार नाही.
जास्त पाण्यामुळे तसेच पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे ज्वारी व मका पिकावर अळ्यांचा प्रादुर्भावर होताना दिसून येत आहे. शेतातील पाणी आटत नाही तोपर्यंत दुसरे पाणी येथे जमा होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. एवढा पाऊस होऊनही शेती उत्पादनात यावर्षी घट होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. तयार झालेल्या कणसांवर नाकतोंड्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत आहे.
यामुळे अळ्या कणसातील दाणा खाऊन भुणके शिल्लक ठेवत असल्याचे दिसत आहे. या मोठ्या पिकात किटकनाशकांची फवारणी करणे शक्य नसल्यामुळे यावर्षी कोरडा ऐवजी ओला दुष्काळाला सामोरे जावे लागेल, अशी चिंता शेतकºयांना लागली आहे. जास्त पावसामुळे कापूस पिकाचेही नुकसान होत आहे. पावसामुळे कापसाचे जे बोंड परिपक्व झाले आहेत त्यांनाही किड लागून नष्ट होतांना दिसून येत आहे. शेतात पाणीच पाणी जमा होत आहे. विहिरी ओसंडून वाहू लागल्या आहेत.
आता उत्तरा नक्षत्र सुरु असून या नक्षत्रात जोरदार व थंड पाऊस होत असतो. या पावसामुळे आता बाजरी, ज्वारीचा चारा देखील गुरांना शिल्लक राहणार नसून हे सर्व ओला दुष्काळाची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, शेतकरी जयसिंग गोजेसिंग गिरासे यांनी सांगितले की, २५ वर्षात असा पाऊस पाहिला नाही. असाच पाऊस सुरु राहिल्यास बाजरी, ज्वारीचा दाणा देखील घरात येणार नाही. यावर्षी कोरड्या ऐवजी ओल्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे.