पैसे घ्यायचा अन् दारू पिण्यासाठी आडोसा द्यायचा!
By देवेंद्र पाठक | Published: January 28, 2024 05:04 PM2024-01-28T17:04:36+5:302024-01-28T17:05:36+5:30
पैसे न देणाऱ्यांना शिवीगाळ करणे, दमदाटी करणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत होते.
धुळे : दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असताना त्यांच्याकडून पैसे घेणाऱ्या तरुणाविरोधात शिरपूर शहर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला. मयूर धर्मराज कुवर (वय २९) असे संशयिताचे नाव आहे. पोलिस कर्मचारी दादाभाई युवराज बोरसे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शिरपूर शहरात सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. या दुकानासमोर दारू पिणाऱ्यांना जागा उपलब्ध करून दिली जात होती. त्याबदल्यात त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. ज्यांच्याकडून पैसे मिळाले नाहीत त्यांना दारू पिण्यासाठी मज्जाव केला जात होता. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला होता.
पैसे न देणाऱ्यांना शिवीगाळ करणे, दमदाटी करणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत होते. त्याला अटकाव करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. हा प्रकार वाढत असल्यामुळे यासंदर्भात शिरपूर शहर पोलिसांकडे तक्रारी दाखल होण्यास सुरुवात झाली. शनिवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलिसांच्या पथकाने अचानक जाऊन छापा टाकला असता हा प्रकार समोर आला. याप्रकरणी मयूर धर्मराज कुवर (वय २९, रा. वरवाडे ता. शिरपूर) याच्याविरोधात रात्री साडेअकरा वाजता फिर्याद दाखल झाल्याने प्रोबिशन कायदा कलम ६८ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील घटनेचा तपास करीत आहेत.