फूस लावून पळविलेल्या पीडितेवर अत्याचार
By देवेंद्र पाठक | Published: April 29, 2023 06:12 PM2023-04-29T18:12:50+5:302023-04-29T18:13:19+5:30
शिरपूर : वाढीव कलमानुसार गुन्हा, संशयित फरार
धुळे : शिरपूर शहरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. चार दिवसांनंतर त्या मुलीचा शोध लागला. पोलिसांनी तिचा जबाब घेतला असून, तिला फूस लावून पळविल्याचे आणि मध्य प्रदेशात नेऊन अत्याचार केल्याचा जबाब तिने नोंदविला. त्यानुसार वाढीव कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित फरार झाला आहे.
शिरपूर शहरातून एका अल्पवयीन मुलीला एकाने २४ एप्रिल रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पळवून नेले होते. याप्रकरणी २५ एप्रिल रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, शुक्रवारी या मुलीचा शोध लागल्याने तिला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तिची अधिक चौकशी करण्यात आली. तिला २४ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता फोन करून एकाने भंडारी टॉकीजजवळ बोलविले. त्यानंतर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तुझ्याशी लग्न करायचे आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, असे म्हणत गळ घातली.
बदनामी करण्याची धमकी देत त्याने तिला जबरदस्तीने बसस्थानकावरून इंदूरकडे जाणाऱ्या बसमधून उज्जैन येथे नेले. तेथे तो त्याच्या मित्राच्या घरी थांबला. त्याठिकाणी त्याने जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या या फिर्यादीवरून शिरपूर पोलिस ठाण्यात वाढीव कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल शिरसाठ करीत आहेत.