फागण्याजवळ गुरांची वाहतूक पोलिसांनी पकडली, पारोळ्याच्या दोघांना अटक
By देवेंद्र पाठक | Published: August 9, 2023 04:49 PM2023-08-09T16:49:42+5:302023-08-09T16:50:41+5:30
पारोळा रोडवरून एक पिकअप व्हॅन जात असून त्यात गुरे असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांना मिळाली.
धुळे : पारोळा रोडवर फागणे शिवारात संशयित पिकअप वाहन अडवून त्याची तपासणी केली असता त्यात गुरे आढळून आली. ही कारवाई मंगळवारी दुपारी १ वाजता करण्यात आली. याप्रकरणी रात्री तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने पारोळा येथील दोघांना अटक करण्यात आली.
पारोळा रोडवरून एक पिकअप व्हॅन जात असून त्यात गुरे असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच फागणे शिवारातील अमळनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तालुका पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास एमएच १८ टी ५०२९ क्रमांकाची पिकअप व्हॅन येताच अडविण्यात आली. व्हॅनमध्ये काय आहे याची विचारणा केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. चालकाला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यात गुरे आढळून आली.
गुरांसह टेम्पो असा एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. गुरांची रवानगी गोशाळेत करण्यात आली. याप्रकरणी पोलिस कर्मचारी नितीन दिवसे यांनी मंगळवारी रात्री १० वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, मुस्तकीम खान (वय २६, रा. मोहम्मद अली रोड, पारोळा) आणि नितीन गणपत चौधरी (वय ४४, रा. बागवान गल्ली, पारोळा) या दोघांना अटक करण्यात आली. पोलिस नाईक ठाकूर घटनेचा तपास करीत आहेत.