गद्दारांना पक्षात पुन्हा प्रवेश नाहीच, परतीचे मार्ग बंद; माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा हल्लाबोल
By देवेंद्र पाठक | Published: February 27, 2023 07:27 PM2023-02-27T19:27:58+5:302023-02-27T19:28:53+5:30
मंत्रिपदासह काही अपेक्षा ठेवून आमदारांचा एक गट आम्हाला सोडून गेला ही वस्तुस्थिती, गिते यांचं वक्तव्य.
देवेंद्र पाठक
धुळे : मंत्रिपदासह काही अपेक्षा ठेवून आमदारांचा एक गट आम्हाला सोडून गेला ही वस्तुस्थिती आहे. आता गेलेल्या आमदारांना पुन्हा शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश नाहीच. त्यांचे पुन्हा परतीचे मार्ग बंद झाले आहेत, अशी स्पष्ट भूमिका माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली.
शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे शिवगर्जना अभियान संपूर्ण राज्यात विभागनिहाय सुरु झाले आहे. धुळ्यात हे अभियानानिमित्त मेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या पुर्वी गिते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत धुळे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक धात्रक, उत्तर महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख शुभांगी पाटील, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेत्या संजना घारी, उषा मराठे, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, हेमंत साळुंखे, प्रा. शरद पाटील आदी उपस्थित होते.
गिते म्हणाले, २५ फेब्रुवारी ते ३ मार्च संपूर्ण राज्यात शिवगर्जना अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत धुळ्यात मेळावा पार पडत आहे. सध्या सुरु असलेल्या राज्याच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेत संताप आहे. ज्याने जन्म दिला त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला गेला आहे. शिवसेनेेचा ठाकरे गट आता संपविण्याचा प्रयत्न सत्ताधारींकडून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. आत्ताचे सरकार जे उद्घाटन करत आहेत, ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेल्या कामांचे आहे. यात वेगळे काही नाही. येणाऱ्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा, कोणत्या जागा हा धोरणात्मक निर्णय आहे, पण शंभर जागा आम्ही निश्चित जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.