धुळे जिल्हा परिषदेच्या ७६ अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:25 PM2018-05-07T22:25:26+5:302018-05-07T22:25:26+5:30
पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन, बांधकाम, लघुसिंचन विभागांना प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन, बांधकाम व लघुसिंंचन विभागांच्या ७६ अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात प्रशासकीय व विनंती अशा दोन्ही पद्धतीच्या बदल्यांचा समावेश असून सर्वाधिक ६७ परिचरांच्या बदल्या झाल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांच्या अध्यक्षतेत ही प्रक्रिया सुरळीत पार पडली.
अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यांची ही प्रक्रिया चार-पाच दिवस चालणार आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या प्रक्रियेला प्रारंभ झाला. प्रत्येक कर्मचा-यांचे म्हणणे ऐकून चर्चेनंतर बदल्यांबाबत निर्णय घेण्यात येत होता. मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.शिवचंद्र सांगळे, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एल.एम. शिंदे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस. पाटील उपस्थित होते.
झालेल्या बदल्या अशा : सामान्य प्रशासन विभाग- वरिष्ठ सहायक- प्रशासकीय १, विनंतीवरून २, कनिष्ठ सहायक - प्रशासकीय १, विनंतीवरून २, परिचर- प्रशासकीय ५८ व विनंती ९, बांधकाम विभाग- शाखा अभियंता- प्रशासकीय १, कनिष्ठ आरेखक- विनंतीवरून १, लघुसिंंचन विभाग- कनिष्ठ अभियंता- आपसी १.
पहिल्या दिवशी जि.प. आवारात बदलीपात्र कर्मचाºयांच्या याद्या पाहण्यासाठी अधिकारी, कर्मचाºयांची जिल्हा परिषदेच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. परिचर कर्मचा-यांच्या गेल्या कित्येक वर्षात बदल्या झालेल्या नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्यांमध्ये बदलीमुळे नाराजी तर काहींना सोयीची बदली मिळाल्याने खुशीचे वातावरण दिसले.
आज कृषी, पशुसंवर्धन विभागाच्या बदल्या
बदली प्रक्रियेच्या दुस-या दिवशी म्हणजे ८ रोजी कृषी आणि पशुसंवर्धन या दोन विभागातील अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया करण्यात येणार आहे. ९ व १० रोजी सीईटी परीक्षेमुळे प्रक्रिया होणार नसून ११, १२ व १४ रोजी पुन्हा ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.