महामंडळाच्या बसमधून देशी दारूची वाहतूक, वाहकामुळे डाव उधळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 07:21 PM2023-05-12T19:21:55+5:302023-05-12T19:22:18+5:30
२५ हजारांचा दारूसाठा जप्त
राजेंद्र शर्मा
धुळे : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून देशी दारूची वाहतूक रोखण्यात शहर पोलिसांच्या शोध पथकाला यश आले. बस वाहकाला संशय आल्याने त्यांनी ही खबर पोलिसांना दिली. गोण्यामध्ये भुशाच्या आड मद्याच्या बाटल्या लपविल्याचे उघड झाले. या कारवाईत पोलिसांनी २४ हजार ५०० रुपयांचा दारूचा साठा जप्त केला आहे.
प्रीप मोतीराम पाटील (४१, रा. सुरत) याला अटक केली आहे. एमएच २० बीएल २५३४ क्रमांकाची अमळनेर-बडोदा ही बस धुळ्यातील बसस्थानकात शुक्रवारी सकाळी सव्वा दहा वाजता आली. या गाडीमध्ये एक जण संशयितरीत्या गोण्या बाळगून होता. बस वाहकाने ही माहिती आगार प्रमुखांना दिली. आगारप्रमुखांनी बसस्थानकात तैनात हवालदार ज्ञानेश्वर साळुंखे आणि वैभव वाडीले यांना कळविले. त्यांच्या माध्यमातून शहर पोलिसांच्या शोध पथकाला माहिती कळविण्यात आली.
लागलीच शोध पथकाचे कर्मचारी बसस्थानकात दाखल झाले. बस धुळ्यातील बसस्थानकात दाखल होताच बसमधील चारही गोण्यांची झडती घेतली. त्यामध्ये भुसाच्या आड दारूसाठा मिळून आला. एकूण ७०० दारूच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या. सदरच्या कारवाईत पकडलेला ऐवज २४ हजार ५०० रुपये इतका आहे. याप्रकरणी पोलिसांनी मद्याची वाहतूक करणारा प्रदीप मोतीराम पाटील (४१, रा. सुरत, गुजरात) याला अटक केली आहे.
शहर पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी विजय शिरसाठ, ज्ञानेश्वर साळुंखे, कुंदन पटाईत, वैभव वाडीले, महेश मोरे, अविनाश कराड, मनीष सोनगीरे, प्रवीण पाटील, गुणवंत पाटील, नीलेश पोतदार यांनी कारवाई केली.