कारमधून होणारी गुटख्याची वाहतूक पकडली; एलसीबीची देवपुरात कारवाई, साडेतीन लाखांचा मुद्देमाल
By अतुल जोशी | Published: July 29, 2023 06:00 PM2023-07-29T18:00:42+5:302023-07-29T18:00:59+5:30
धुळे : देवपूर परिसरातील अंदरवाली मशिद परिसरात एका कारमधून होणारी गुटख्याची वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी पकडली. ...
धुळे : देवपूर परिसरातील अंदरवाली मशिद परिसरात एका कारमधून होणारी गुटख्याची वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी पकडली. पोलिसांनी या कारवाईत अडीच लाख रुपयांच्या कारसह १ लाख २ हजार ९५० रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांना (एमएच १८, टी १८२५) क्रमांकाच्या कारमधून गुटख्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार देवपुरातील अंदरवाली मशिद भागात एका गल्लीतून कार शोधण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. पोलिसांनी कारची तपासणी केली असता, त्यात ८४ हजार १५० रुपयांचा विमत पान मसाला, १८ हजार ८०० रुपयांचा पान मसाला आणि २ लाख ५० हजार रुपयांची कार असा एकूण ३ लाख ५२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी शुक्रवारी रात्री ११ वाजता देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार चार जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, प्रकाश पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक शाम निकम, कर्मचारी शशिकांत देवरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, प्रशांत चौधरी, प्रल्हाद वाघ, जितेंद्र वाघ, हर्षल चौधरी यांनी केली.