भंगार बसेसमधून प्रवाशांना करावा लागतो जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 10:54 PM2019-12-22T22:54:52+5:302019-12-22T22:55:28+5:30
धुळे आगारातील बसेची स्थिती ...
धुळे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे बस आगारातील बहुतांश बसेसची दयनीय अवस्था झाली आहे़ या बसेस भंगारमध्ये टाकण्याच्या लायकीच्या असतांनाही रस्त्यांवरून धावत आहेत. भंगार बसमधूनच प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय.
‘बहूजन हिताय बहूजन सुखाय’ हे ब्रिद घेऊन प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यालय धुळ्यात आहे़ तीन राज्याच्या सीमेवर असलेल्या धुळे आगारातून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करीत असतात. असे असले तरी या आगाराच्या अनेक बसेस मोडकळीस आलेल्या आहे. त्यांचे इंजिन बीएस- २, बीएस-३ तसेच बीएस-४ प्रकारचे आहेत़
ग्रामीण भागात जास्त प्रवास
धुळे आगारातील जुन्या बसेसचा सर्वाधिक वापर ग्रामीण भागासाठी केला जातो़ त्यात लामकानी, मोघण, वार-कुंडाणे, लळींग, आर्वी, बोरीस, कापडणे, तिथी, देवी, दºहाणे-बह्याने, तिसगाव- ढंढाणे अशा गावातील प्रवासी वाहतुकीसाठी या बसेस वापर केला जातो़ यापैकी काही बसेच्या काचा फुटलेल्या आहेत़ आसन व्यवस्थेवर धूळ चढलेली आहे़ बसच्या समोरील इंजिनचा भाग उघडा पडला आहे़ तर काही बसेसचा पाठीमागील भागाच गायब असल्याचे आज केलेल्या पाहणीत दिसून आले़ महामंडळ दरवर्षी प्रचंड भाडेवाढ करीत असते. त्यामानाने प्रवाशांना सुविधा देण्याकडे कानाडोळा केला जातो असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
रस्त्याची मुख्य अडचण
बहूसंख्य गावातील रस्ते खराब झाल्याने, वाहनांची वयोमर्यादाही कमी होत आहे़ त्यामुळे बसेस मोडकळीस येत आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास देखील धोक्यात आला आहे़ त्यामुळे आठवड्यातून किमान एक ते दोन बस खराब होऊन रस्त्यावर बंद पडत असतात. याचा त्रास प्रवाशांनाच सहन करावा लागतो.
वायफाय सेवा देखील झाली बंद
प्रवाशांच्या मनोरंजनासाठी महामंडळाने बसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली होती़ मात्र अल्पावधीतच या सुविधेचा बोजवारा उडालेला आहे. बसमधील वायफाय बाक्स नावालाच आहेत.
धुळे आगाराने प्रवाशांसाठी सुस्थितीतील बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा आहे. दरम्यान गेल्या पाच वर्षांपासून आगाराला नवीन गाड्याच उपलब्ध झाल्या नसल्याचे धुळे आगारातून सांगण्यात आले.