ट्रॅव्हल्स सुसाट... एसटी मात्र कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:26 AM2021-05-28T04:26:35+5:302021-05-28T04:26:35+5:30
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने सुरक्षिततेचे उपाय म्हणून राज्य शासनाने २२ एप्रिलपासून जिल्हाबंदीसह कडक निर्बंध घातले. खासगी व सार्वजनिक ...
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने सुरक्षिततेचे उपाय म्हणून राज्य शासनाने २२ एप्रिलपासून जिल्हाबंदीसह कडक निर्बंध घातले. खासगी व सार्वजनिक वाहतूक गेल्या वर्षाप्रमाणे पूर्णत: बंद न करता, वाहतुकीसाठी काही नियम घालून दिले आहेत. त्या नियमानुसार प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. खासगी प्रवासी वाहतूक करण्यापूर्वी प्रवाशाची थर्मल स्कॅनिंग करणे, ऑक्सिजन पातळी मोजणे, जिल्ह्याबाहेर प्रवास करणाऱ्यांकडे ई-पास असणे आदी गोष्टी सक्तीच्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र याकडे सरसकट दुर्लक्ष केले जात आहे.
कडक निर्बंध लागल्यानंतर २२ एप्रिलपासून एसटीची ग्रामीण सेवा पूर्णत: बंद करण्यात आलेली आहे. लॅाकडाऊन जाहीर होण्यापूर्वी धुळे आगारातून मोठ्या शहर व ग्रामीण भागासह तब्बल ९९ शेड्युल्ड होते. यातून एकट्या धुळे आगाराला १२ ते १४ लाखांचे दररोजचे उत्पन्न मिळत होते. आजच्या स्थितीत फक्त जळगाव, नाशिकसाठी एक-एक फेरी सुरू असून, त्यातून तोडके उत्पन्न मिळत आहे.
याउलट स्थिती खासगी ट्रॅव्हल्सची आहे. लॉकडाऊनपूर्वी धुळे शहरातून पुणे, मुंबईसाठी अनेक गाड्या सुटत होत्या.त्यातून हजारो प्रवासी प्रवास करीत हाेते. मात्र आता गाड्यांची संख्या कमी झालेली आहे. आता फक्त शहरातून ४-५ गाड्या मुंबईसाठी जातात, असे सांगण्यात येते.
ट्रॅव्हल्स जाऊ शकते मग एसटी का नाही?
अमळनेर, जळगाव, धुळे आदी भागातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या जास्त आहे. रात्री ८ ते १० दरम्यान महामार्गावर निरीक्षण केल्यास त्यात अनेक ट्रॅव्हल्स धावतांना दिसतात. या ट्रॅव्हल्समध्ये ५० टक्केच प्रवासी बसविण्यात येत असले तरी किमान त्या सेवा देत आहेत. मात्र एसटी महामंडळाची बस नाशिकच्या पुढे जाऊ शकली नाही. खासगी ट्रॅव्हल्सला जे जमू शकते ते एसटीला का नाही? असा प्रवाशांचा प्रश्न आहे.
भाड्यातही तफावत
सध्या प्रवाशांना मोजकी प्रवासाची साधने उपलब्ध आहेत. खासगी वाहन करून जाणे मुंबई, पुण्याला जाणे शक्य होत नाही. याचा फायदा घेत काही ट्रॅव्हल्सधारक प्रवाशांकडून जादा भाड्याची आकारणी करतात. गरज असल्याने, प्रवासीही जादा भाडे देतात. एसटीनेही मर्यादित प्रवासी घेऊन सेवा दिल्यास प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
एसटीचे नियम किचकट
एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी नियम अतिशय किचकट बनविलेले आहे. यात प्रवासाचे कारण काय? प्रवास करणाऱ्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारणे आदी गोष्टींमुळे प्रवासीही एसटीपासून लांब गेला आहे. याउलट स्थिती ट्रॅव्हल्सची आहे. ट्रॅव्हल्सने प्रवास करताना एवढे नियम नसल्याने, साहजिकच प्रवासी ट्रॅव्हल्सने प्रवास करीत आहे. याचा फायदा ट्रॅव्हल्सला होत आहे, तर एसटीला नुकसानच सोसावे लागत आहे.
ई-पास कोणाकडेही नाही
जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांना तसेच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना ई-पासची सक्ती करण्यात आले आहे. मात्र त्याच्या अंमलबजावणीकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या एकाही प्रवाशाकडे ई-पास उपलब्ध नसल्याचे आढळले. गेल्या वर्षाप्रमाणे यंदा ई-पाससाठी ऑनलाइन नोंदणी फारशी नाही.
एसटीची नाशिक, जळगाव, चोपडा सेवा सुरू
तब्बल महिनाभर बंद असलेली एसटी गुरुवारपासून हळूहळू आगाराबाहेर पडू लागली आहे. अगोदर फक्त नाशिक आगारातून धुळेसाठी बस येत होती. मात्र गुरुवारपासून नाशिक, जळगाव, चोपड्यासाठी सेवा सुरू झाली. अर्थात प्रवासी उपलब्धतेनुसार व योग्य कारण असलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. गुरुवारी नाशिक, जळगावसाठी तीन व चोपड्यासाठी एक बस सोडण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख स्वाती पाटील यांनी दिली. तर काही बाहेरच्या आगाराच्या बसेसही येऊ लागल्याने, गेल्या महिन्यापासून शुकशुकाट असलेल्या बसस्थानकात प्रवाशांची थोडी वर्दळ वाढलेली आहे.