मोबाईल अॅपद्वारे होणार कल चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:10 PM2018-12-16T17:10:55+5:302018-12-16T17:11:23+5:30
उत्सुकता : विद्यार्थ्यांची आवड कोणत्या क्षेत्रात आहे, याची माहिती मिळू शकणार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : इयत्ता दहावीसाठी घेण्यात येणारी कलमापन चाचणी आता मोबाईल अॅपद्वारे घेण्याचा निर्णय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.या संदर्भात शिक्षकांना नुकतेच जो.रा.सिटी हायस्कुलमध्ये प्रशिक्षण देण्यात आले.
दहावीनंतर कुठले क्षेत्र निवडायचे, याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. त्यासाठी ही कल चाचणी अत्यंत महत्वाची असते. या कलमापन चाचणीमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळण्यास तसेच त्यांची आवड कोणत्या क्षेत्रात आहे, हे कळण्यास मदत होत असते.
शिक्षण विभाग, विद्या प्राधिकरण, आणि श्यामची आई फाऊंडेशन या तिघांनी मिळून हा उपक्रम सुरू केलेला आहे.
या संदर्भात काही शिक्षकांचे नुकतेच जो.रा. सिटी हायस्कूलमध्ये प्रशिक्षण झाले आहे. त्यांना मोबाईल अॅपद्वारे कलचाचणी व अभिक्षमता चाचणी कशा प्रकारे घेण्यात यावी, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील विस्तार अधिकारी रंजीता ढिवरे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये १८ डिसेंबर १८ ते १७ जानेवारी १९ या कालावधीत दहावीतील विद्यार्थ्यांची कलचाचणी व अधिक्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. दरम्यान शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.
पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे प्रयोग यापूर्वी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी, अधिक्षमता चाचणी कॉम्युटरद्वारे घेण्यात येत होती. मात्र अनेक शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात संगणक उपलब्ध नसणे, ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नसणे आदी तांत्रिक कारणामुळे ही चाचणी घेण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या. यावर पर्याय म्हणून मोबाईल अॅपद्वारे कलचाचणी, अधिक्षमता चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत असलचे सांगण्यात आले. याचा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकणार आहे.