वनहक्क दाव्यांसाठी आदिवासींचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 09:33 PM2019-09-13T21:33:36+5:302019-09-13T21:33:57+5:30
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा : मागण्यांवर सुमारे चार तास चर्चा
धुळे : सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या पुढाकाराने आदिवासी बांधवांनी वनहक्क दाव्यासाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला़ त्यानंतर प्रांतांसह विविध विभागांच्या अधिकाºयांसोबत वनहक्क दावे व अन्य मागण्यांवर सुमारे चार तास चर्चा झाली. मागण्यांबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
चर्चेत प्रांताधिकारी भीमराज दराडे, सभेचे सुभाष काकुस्ते, किशोर ढमाले व अन्य पदाधिकारी, तसेच वनविभाग, वीज महावितरण, अग्रणी बॅँक, कृषी विभाग, तहसील कार्यालय, पंचायत समिती यांचे अधिकारी उपस्थित होते. प्रांत कार्यालयात चर्चा सुरू असताना कार्यालयाच्या बाहेर आदिवासी बांधवांनी ठिय्या दिला.
दरम्यान, दुपारी साडेतीन वाजता सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्यावतीने धुळ्यातील संतोषी माता चौकापासून मोर्चाला दुपारी सुरुवात करण्यात आली़ आदिवासींचा हा मोर्चा पुढे फाशी पूल मार्गे महात्मा फुले पुतळाकडून तहसील कार्यालयमार्गे हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर सायंकाळी धडकला़
अनुसुचित जमाती व इतर पारंपारीक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ तसेच सुधारणा नियम २०१२ अंतर्गत दावे दाखल केलेल्या प्रलंबित ५ असलेले सर्व दावे मंजूर करावीत़ धुळे तालुक्यात अनेक लोकांचे दावे दाखल करायचे राहून गेलेले आहेत तसे सादर करुन घ्यावेत़ दावे दाखल केलेल्या लोकांना किमान दोन पुराव्यांच्या आधारे पात्र घोषीत करण्यात यावे़ धुळे तालुक्यातील बोरकुंड, अजनाळे, जुनवणे, बोरविहिर, विंचूर, हरसुणे, बाभुळवाडी, वडजाई या गावातील लोकांना वनजमिनीपासून वनविभागाने बेदखल करण्याचे काम केले आहे, ते वन खात्याने ताबडतोब बंद करावे़ विंचूर, जुनवणे, सडगाव, हेंकळवाडी या विविध गावातील दावे तहसील कार्यालयात ५ मे २०१५ रोजी जमा केली़ परंतु हे दावे ग्रामपंचायतीकडे परत पाठविले गेले तर काही गहाळ झाले त्या दाव्यांचा तपास करुन प्रांताधिकारी कार्यालयात जमा करण्यात यावे, यासह विविध स्वरुपाच्या ३२ मागण्यांवर चर्चा झाली. त्यावर संबंधित विभागांकडून तत्परतेने कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.