आदिवासी बांधवांचे ‘ऊल गुलान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 09:59 PM2019-08-09T21:59:30+5:302019-08-09T21:59:42+5:30
जागतिक आदिवासी गौरव दिन : विविध उपक्रमांनी होणार गौरवशाली इतिहासाचा जागर
आॅगस्ट महिना हा खºया अर्थाने स्वातंत्र्याचा उत्सव असलेला महिना आहे. १५ आॅगस्टला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. ९ आॅगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवस. एका अर्थाने स्वातंत्र्य प्राप्तीचा जागर करण्याचा हा दिवस असून आदिवासी बांधवांच्या दृष्टीने ही ऐतिहासिक महत्व असलेला हा दिवस. तर ३१ आॅगस्ट या दिवशी झलकारी बाई याच दिवशी इंग्रजांशी लढली म्हणून जन्मजात भटक्या लोकांचा विमुक्त दिवस म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो.
एका दिवसापुरते आपण हे दिवस साजरे करतो आणि या प्रती असलेले आपले कर्तव्य आपण विसरुन जातो. भारत स्वतंत्र होऊन कित्येक वर्ष लोटली तरी आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एकविसाव्या शतकात जग प्रवेश करत असतानासुद्धा आदिवासी जमातीची कुटुंबे आजही उपेक्षित असून गरिबी, अशिक्षित, बेरोजगारी, कुपोषण अंधश्रद्धा या विळख्यातून मुक्त झालेला दिसून येत नाही आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने (युनो) ने १९९४ पासून ९ आॅगस्ट हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन म्हणून जाहीर केला आहे. आदिवासींचा गौरव दिन म्हणून देखील जगभर साजरा केला जातो. आदिवासी समाजाची आजही खरी ओळख प्रबुद्ध वगार्ला झालेली नाही. आदिवासी म्हटले म्हणजे डोंगर -दºयात राहणारा उघडा, नागडा, वल्कले घालणारा, जनावरांचे कच्चे मांस भक्षण करणारा, अक्राळविक्राळ, क्रूर समुदाय अशी चित्रपटात रंगवलेली खोटी समज घराघरात माध्यमातून टीआरपीसाठी खपवली गेली आहे. खरे तर आदिवासी संस्कृती अतिशय समृद्ध अशी इतिहासाचा वारसा असलेला पुरातन समाज आहे. आमच्या लहानपणी अनेक आदिवासी शुरवीरांच्या कथा आजोळी ऐकायला मिळायच्या मात्र त्यांचा हा इतिहास शहरात आल्यावर पुस्तकात कधीं ही वाचायला मिळाला नाही. या कथा कदाचित दंत कथा असाव्यात, असे लहानपणी वाटले. मात्र पुढे याविषयी आपण संशोधन करावे असे ठरवले. हळूहळू अभ्यास करतांना इतिहासाची अनेक पाने उलगडताना लक्षात आले की आपले आजी आजोबा जो इतिहास लहानपणी सांगायची ते सगळे सत्य होत. मात्र इतिहासातील अनेक लेखण्या या आदिवासींच्या इतिहासाविषयी मौन बाळगून होत्या. चोर, दरोडेखोर म्हणून चुकीचा खोटा उल्लेख केलेला होता. मात्र हा खरा इतिहास जर अभ्यासल्यावर लक्षात आला. आदिवासी समाज शहरापासून कोसो दूर जंगलात शांतीपूर्वक जीवन जगणारा विशेषत: निसर्गपूजक असा हा समाज आहे.
निसर्ग हाच धर्म जे जाणणारा या समाजाच्या जंगलावर इंग्रजांनी आक्रमण करत जंगल, जमीन हस्तगत करायला सुरवात केली, तेव्हा मात्र देशभर आदिवासींच्या आंदोलनाचा भडका उडाला. हा विद्रोह म्हणजे उलगुलांन. १८५७ चा उठावाला इतिहासकार राष्ट्रीय आंदोलनाचा पाया म्हणतात. मात्र त्याही पूर्वी अनेक वेळा आदिवासीनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढे उभारत अनेक वेळा वरचढ ठरले मात्र या कथांची उजळणी इतिहासाच्या कोणत्याही पुस्तकात पोहचली नाही. परिणामी आदिवासी समाजाच्या इतिहासाची खरी ओळख जगाला होऊ शकली नाही.
देशात धर्माच्या नावाने सहजच दंगली भडकवल्या जाऊ शकतात. अशा वेळी आदिवासी समाज हा प्रकृती, निसर्ग धर्म मानणारा समाज आहे. अनादी काळापासून अत्यंत शांततेन जीवन जगत आहे. निसर्ग हाच परमेश्वर मानणारा या समाजाची खरी ओळख अजूनही कुणालाच नाही. जंगलात वावरताना गुळगुळीत काळ्या दगडाची देवता समजून पूजा केली जाते. दुधाचा अभिषेक केला जातो. या साठी झाडाची पाने, फुले, बेल या माध्यमातून पूजा केली जाते. दगड नसतील तर मातीचे गोळे बनवले जातात. साधी सरळ कृतज्ञता निसर्गाप्रती व्यक्त करणारा हा समाज आहे. या सारख्या अनेक परंपरा आजही आदिवासी समाज सांभाळून आहे. मात्र या परंपरा कुठेही अधोरेखित केल्या जात नाहीत. जोपर्यंत आदिवासी स्वातंत्र्य सैनिक व समाजाचा सांस्कृतिक उल्लेख भारतीय इतिहासात केला जात नाही तो पर्यंत तो निश्चितच अपूर्ण व दुर्लक्षितच असणार आहे.
- प्रा.डॉ.जयश्री गावीत,
विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे