धुळे येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 04:31 PM2018-08-06T16:31:26+5:302018-08-06T16:34:44+5:30
डीबीटी पद्धत बंद करण्याची मागणी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकाºयांना दिले निवेदन
आॅनलाइन लोकमत
धुळे :शासनाने आदिवासी मुला-मुलींच्या विभागीय व जिल्हास्तरीय वसतीगृहातील नाश्ता, जेवण बंद करून, ती रक्कम डीबीटी पद्धतीने विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पद्धत अन्यायकारक असून ती बंद करावी यासाठी जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी, त्यांचे पालक, समाजबांधवांनी आज धुळे येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
या विभागाचे प्रकल्प अधिकारी आर. आर. हळपे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, शासनाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. २०१८-१९ हे शैक्षणिक वर्ष सुरू होवून अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. परंतु वसतीगृहातील शासकीय खानावळ बंद असल्याने, विद्यार्थी गावी परत जात आहे.
शासनाने थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेमध्ये मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यावर किंवा प्रत्यक्ष अनुदान देणे आवश्यक होते. आदिवासी विभागाची संगणकीय प्रणाली बिघडली असल्याने, विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था वसतीगृह व्यवस्थापक करू शकत नाही. विभागीयस्तरावरील आदिवासी विद्यार्थ्यांना ३५०० तर जिल्हास्तरावर ३ हजार रूपये पुरेशे नाहीत.
शासनाने तीन महिन्याचे जेवणाचे एकत्रित अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात नवीन विद्यार्थ्यांचे बॅँक खाते उघडणे, नियोजन करणे, शासनाद्वारे बॅँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण करणे यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे वसतीगृह आहार थेट लाभ हस्तांतरण पद्धत तत्काळ रद्द करून, पूर्ववत वसतीगृहातच जेवण उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.
आदिवासी विद्यार्थी, पालक व समाजबांधवांनी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले. यावेळी शासनविरोधी घोषणा देण्यात आल्या. ठिय्या आंदोलनात जवळपास २५० विद्यार्थी, पालक सहभागी झाल्याची माहिती आदिवासी एकता परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष रोशन गावीत यांनी दिली. ठिय्या आंदोलनस्थळी आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा सचिव दीपक अहिरे, राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या ज्योती पावरा यांनी भेट दिली होती.