गुरांचे चामडे घेऊन जाणारा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:05 PM2020-01-25T23:05:02+5:302020-01-25T23:05:02+5:30
धुळे तालुका पोलीस : ७ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल
धुळे : गुरांचे चामडे जळगावच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या ट्रकला धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने शिताफिने पकडले़ अडीच लाखांचे चामडे आणि ५ लाखांचा ट्रक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ ही कारवाई धुळे तालुक्यातील मुकटीनजिक शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली़
पारोळा रोडने एक ट्रक जळगावच्या दिशेने गुरांचे चामडे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती धुळे तालुका पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना मिळाली़ माहिती मिळताच त्या ट्रकची खातरजमा करण्यात आली़ तालुका पोलिसांचे पथक शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पारोळा रोडने मुकटी गावापर्यंत गेले़ पथकाने मुकटी बसस्थानकाच्या परिसरात रोडवर सापळा लावला होता़ रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पारोळाच्या दिशेने जाणारा डब्ल्यूबी ११ डी ३२८६ क्रमांकाचा ट्रक पोलिसांना दिसला़ मिळालेल्या माहितीनुसार हाच ट्रक असल्याने पोलिसांनी तो थांबविला़ ट्रकचालक मोईन खान सत्तार खान (५९, झारखंड) याच्याकडे ट्रकमध्ये काय आहे, अशी विचारणा केली़ यावर त्या ट्रकचालकाने उडवा-उडवीची उत्तरे दिली़ परिणामी पोलिसांना आणखी संशय बळावला़ त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्या ट्रकची तपासणी करण्यात आली़ या ट्रकमध्ये २ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे गुरांचे ८५० नग चामडे मिळून आले़ या चामड्यांसह पोलिसांनी ५ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण ७ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे़
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रुपेश काळे, पोलीस उपनिरीक्षक सुखदेव भोरकडे, कैलास चौधरी, पोलीस कर्मचारी प्रविण पाटील, शुरसिंग पाडवी, दिनेश मावची, देसले यांनी ही कारवाई केली़ ट्रक चालक संशयित ट्रकचालक मोईन खान सत्तार खान याच्याविरुध्द पोलीस कर्मचारी दिनेश मावची यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे़ घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल ए़ टी़ सोनवणे करीत आहेत़