गुटखा, पानमसाला वाहून नेणारा ट्रक आर्वी शिवारात पकडला
By देवेंद्र पाठक | Published: April 30, 2023 07:02 PM2023-04-30T19:02:17+5:302023-04-30T19:03:03+5:30
१५ लाखांचा मुद्देमाल जप्त, चालकासह तिघांविरोधात गुन्हा
धुळे : मालेगावकडून धुळ्याकडे येणाऱ्या ट्रकची धुळे तालुक्यातील आर्वी शिवारात तपासणी करण्यात आली. त्यात ६ लाख ७० हजार १४८ रुपयांचा गुटखा, पानमसाला आढळून आला. ही कारवाई शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता करण्यात आली असून याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात चालकासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून एका ट्रकमधून सुंगधित पानमसाला, गुटख्याचा साठा वाहून नेला जाणार असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली.
माहिती मिळताच धुळे तालुक्यातील आर्वी पोलिस चौकीजवळ गतिरोधकाजवळ पोलिसांनी सापळा लावला. मालेगावकडून धुळ्याकडे येणारा एमपी ०९ जीपी ०३०२ क्रमांकाचा ट्रक येताच त्याला थांबविण्यात आले. चालकाकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पोलिसांना संशय आल्याने ट्रक ताब्यात घेण्यात आला आणि तपासणी केली असता त्यात ६ लाख ७० हजार १४८ रुपये किमतीचा साठा मिळून आला. या साठ्यासह ८ लाखांचा ट्रक असा एकूण १४ लाख ७० हजार १४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सुनीलकुमार देविसिंह मिना (वय ५२, रा. इंदूर, मध्य प्रदेश) याच्यासह वाहनाचा मालक (नाव माहिती नाही) आणि पुरवठादार (नाव माहिती नाही) अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात चालक सुनीलकुमार मिना याला अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक महाजन घटनेचा तपास करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"