धुळ्याला जाणारा प्रत्येक ट्रक तपासला अन् मग मिळाला ६५ लाखाचा गुटखा!
By देवेंद्र पाठक | Published: December 22, 2023 04:53 PM2023-12-22T16:53:18+5:302023-12-22T16:54:45+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,मुद्देमालासह चालकाला अटक. शिरपूरकडून येणारा ६५ लाखाचा गुटखा सोनगीरजवळ पकडला.
देवेंद्र पाठक,धुळे : शिरपूरकडून धुळ्याकडे ट्रकमधून येणारा गुटखा सोनगीर टोलनाक्याजवळील हॉटेल सत्यमसमोर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली असून २० लाखाच्या ट्रकसह ८५ लाख ७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चालकाला अटक करण्यात आली आहे.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूरकडून एक ट्रक धुळ्याच्या दिशेने येत असून त्यात गुटखा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. माहिती मिळताच सोनगीर टोलनाक्याजवळील हॉटेल सत्यमसमोर पथकाने सापळा लावला. धुळ्याकडे येणाऱ्या प्रत्येक ट्रकची तपासणी सुरू करण्यात आली. एचआर ३८ एसी ०४२२ क्रमांकाचा ट्रक येताच चालकाकडे विचारणा करण्यात आली. त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने चालकासह ट्रक ताब्यात घेण्यात आला.
ट्रकची तपासणी केली असता त्यात ५६ लाख २५ हजार ९०० रुपये किमतीचा पानमसाला, ८ लाख ८२ हजार रुपयांचा गुटखा आणि २० लाखाचा ट्रक असा एकूण ८५ लाख ७ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक नरेशकुमार धनश्यामसिंग चौधरी (वय ४२, रा. मुरसाना, सहकारी नगर, जि. बुलंदशहर, उत्तरप्रदेश) याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात सोनगीर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक गणेश फड, सहायक पोलिस उपनिरीक्षक श्याम निकम, संजय पाटील, कर्मचारी संदीप सरग, प्रकाश सोनार, हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, संतोष हिरे, संदीप पाटील, अशोक पाटील, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी, सुरेश भालेराव, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, जितेंद्र वाघ, जगदीश सूर्यवंशी, महेंद्र सपकाळ, गुणवंत पाटील यांनी ही कारवाई केली.