ट्रकचालकाला मारहाण करून ४५ हजार रूपये लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 07:01 PM2017-10-04T19:01:43+5:302017-10-04T19:03:27+5:30
नेर जवळील घटना : अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दुचाकीस्वारांनी ट्रक अडवून चालकाला मारहाण करीत, त्याच्याजवळील रोख रक्कम व मोबाईल असा ४५ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना मध्यरात्री सुरत महामार्गावरील नेर गावाजवळ घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात लुटारूंविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नेर (ता.धुळे) येथील ट्रक चालक उमेश माळी व सहचालक विनोद उर्फ भावडू तानकू मोरे यांनी राजकोट (गुजरात) येथून ट्रकमध्ये (क्र.एमएच १८-ए.ए.७३४९) टाईल्स भरून ते मालेगावला गेले होते. मालेगावला टाईल्स उतरविल्यानंतर ते ट्रकने नेर गावाकडे येत होते.
नेरजवळील लोढा नाल्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांचा ट्रक अडवला. दुचाकीवरील दोघांनी चालक व सहचालकाला रॉडने मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच त्यांच्याजवळील ४३ हजार ९९० रूपे रोख आणि एक हजार रूपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ४५ हजाराचा ऐवज लंपास केला.
घटनेनंतर ट्रक चालकांनी तालुका पोलीस स्टेशनला धाव घेतली. तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे,एसएसआय डोके, हेड कॉन्स्टेबल मोहने, पोलीस नाईक बागले, भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात लुटारूंविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.