पिस्तुलचा धाक दाखवत ट्रक पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 06:53 PM2018-10-23T18:53:46+5:302018-10-23T18:54:38+5:30
महामार्गावर दरोडा : मुद्देमालही लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर सशस्त्र दरोडेखोरांनी चालकावर पिस्तुल रोखून सुमारे १३ लाखांच्या मुद्देमालांसह ट्रक पळविल्याची घटना सोमवारी रात्री घडली़ याप्रकरणी मंगळवारी पहाटे मोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला़
शरद बाळासाहेब चव्हाण (३२, बांभोरा जि़ अहमदनगर) या तरुण शेतकºयाने फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, शरद चव्हाण हे लेबर कॉन्ट्रॅक्टर असून ते दौंड येथील साखर कारखान्यात मजूर पुरविण्याची कामे करतात़ सोमवार २२ आॅक्टोबर रोजी अमळनेर येथून एमएच १८ एए ४४५१ या ट्रकमध्ये ११ बैल तर एमएच १८ एए ५७२४ क्रमांकाच्या ट्रकमध्ये ७ बैल आणि १० लोखंडी गाडे भरलेले होते़ हे दोनही ट्रक अमळनेर येथून धुळेमार्गे दौंडकडे जात असताना मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे तालुक्यातील अवधान गावाजवळ एमएच १८ एए ५७२४ हा ट्रक पुढे निघून गेला़ त्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दुसरा ट्रक महामार्गावर निघाला़ अवधान एमआयडीसीपासून १ किमी इतक्या अंतरावर दुचाकी आणि चार चाकी वाहनातून आलेल्या २५ ते ३० जणांनी ट्रकला घेरले़ पोलिसात असल्याचे सांगून दोन दरोडेखोर गावठी कट्टे घेऊन ट्रकमध्ये चढले़ चालकावर पिस्तूल रोखून त्यांनी ट्रक अवधान फाट्यापर्यंत आणला़ त्यानंतर या दरोडेखोरांनी ट्रक चालकाला ट्रकमधून उतरविले आणि ट्रकसह पलायन केले़
एकूण १२ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल दरोडेखोरांनी जबरीने चोरुन नेला़ २५ ते ३० वयोगटातील दरोडेखोर मराठी व हिंदी भाषा बोलत होते़ याप्रकरणी भादंवि कलम ३९५ प्रमाणे मोहाडी पोलिसात दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील घटनेचा तपास करीत आहेत़