ट्रक थांबवला; अवैध तंबाखूसह १४ लाखांचा मुद्देमाल पकडला
By देवेंद्र पाठक | Updated: June 23, 2024 22:16 IST2024-06-23T22:16:06+5:302024-06-23T22:16:30+5:30
हाडाखेड तपासणी नाक्यावरील कारवाई, चालक अटकेत

ट्रक थांबवला; अवैध तंबाखूसह १४ लाखांचा मुद्देमाल पकडला
देवेंद्र पाठक, धुळे : वाहनाची तपासणी करत असताना त्यात अवैध तंबाखूचा साठा आढळून आल्याची घटना शिरपूर तालुक्यातील हाडाखेड तपासणी नाक्यावर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता घडली. यात ३ लाख ९६ हजार ८०० रुपयांची तंबाखू आणि १० लाखांचा ट्रक असा एकूण १३ लाख ९६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला अटक केली आहे.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील हाडाखेड तपासणी नाक्याच्या परिसरात वाहनाची तपासणी सुरु होती. अशातच एका वाहनावर संशय आल्याने ट्रक थांबविण्यात आला. चालकाकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. संशय आल्याने ट्रक बाजुला करून तपासणी केली असता त्यात बेकायदेशीर तंबाखूचा ३ लाख ९६ हजार ८०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी एचआर ४७ ई ५१४० क्रमांकाचा १० लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण १३ लाख ९६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून जमशेद फजरअली (वय ३६, रा. मेवात, हरियाणा) याच्या विरोधात चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ घटनेचा तपास करीत आहेत.