बेन्टेक्सच्या दागिन्यांना हात न लावता चोरट्यांकडून खरे दागिने, रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 01:02 PM2019-09-30T13:02:39+5:302019-09-30T13:03:01+5:30
श्रीराम नगर : सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचे बंद घर पाठीमागून फोडले
धुळे : सेवानिवृत्त मुख्याध्यापिका रेणुका पेटारे यांचे बंद घर पाहून चोरट्याने हातसफाई केल्याची घटना वाडीभोकर रोडवरील श्रीराम कॉलनीत घडली़ चोरट्याने घराचा मागील दरवाज्याने आतमध्ये शिरुन सामान अस्ताव्यस्त केले़ बेन्टेक्सचे खोटे दागिने तिथेच सोडून खरे दागिने, रोकड चोरट्याने लांबविले़
देवपुरातील वाडीभोकर रोडवरील कॉलनी प्लॉट नंबर ६३ मध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापिका रेणुका राजेंद्र पेटारे राहतात़ त्या आपल्या परिवारासोबत बाहेरगावी गेल्या होत्या़ ही संधी साधून चोरट्याने हातसफाई केली़ घराचा मागील दरवाजा तोडून चोरटा घरात शिरला़ त्याने घरातील संसारोपयोगी साहित्य अस्ताव्यस्त करीत शोधा शोध सुरु केली़ त्यात त्याला बेन्टेक्सचे काही दागिने सापडले़ या दागिन्यांना त्याने हात न लावता ते तिथेच राहू दिले़ तर, घरात कपाटात ठेवलेले ३ ग्रॅम याप्रमाणे ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे सेट, ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी असे एकूण १२ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, काही चांदीची भांडी व चांदीच्या देवांची मुर्ती तसेच कपाटात ठेवलेले दहा ते पंधरा हजार रोख रक्कम असा एकूण ऐवज चोरांनी लंपास केला आहे़
शनिवारी रेणुका पेटारे या गावाहून परत आल्यानंतर घर उघडताच त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले़ घटनेची माहिती पश्चिम देवपूर पोलिसांना कळविण्यात आली़ त्यानंतर घटनास्थळी श्वान पथकासह ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले़ श्वानाने वाडीभोकर रोडापर्यंत माग दाखविला असता श्वान तिथेच फिरत होते़ पोलीस तपास सुरु आहे़