कापडण्याचा मुळा सुरतकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2017 05:44 PM2017-01-08T17:44:25+5:302017-01-08T17:44:25+5:30
तालुक्यातील कापडणे येथील दीडशे एकर जमिनीवर मुळा पिकांची लागवड करण्यात आली आहे. यंदा येथील शेतकऱ्यांना मूळ्याचे चांगले उत्पादन मिळाले असून येथे उत्पादीत झालेला मुळा
धुळे : तालुक्यातील कापडणे येथील दीडशे एकर जमिनीवर मुळा पिकांची लागवड करण्यात आली आहे. यंदा येथील शेतकऱ्यांना मूळ्याचे चांगले उत्पादन मिळाले असून येथे उत्पादीत झालेला मुळा गावातील नदी चौकातून दररोज रात्री ट्रकद्वारे सुरतकडे रवाना होत आहे. सुरत येथील बाजारपेठेत मूळ्याला चांगली मागणी असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कापडणे गावात मुळा पीक हे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही ऋतूत घेतले जाते. मूळ्यासह कोथिंबीर, पालक, फ्लॉवर, पत्त कोबी, मेथी, टमाटे, मिरची, वालपापडी, शेवगा आदी पिकेही घेतली जातात. सद्य: परिस्थितीत गावातील शंकर नवल माळी, अरुण पुंडलिक पाटील, शरद भिका बोरसे, विजय हिंमत पाटील, जयवंत विठ्ठल माळी, हिराचंद लोटन माळी, सुरेश बोरसे, बन्सीलाल रतन माळी, भीमराव किसन माळी, राजेंद्र बोरसे, शशिकांत पोपट पाटील आदी शेतकऱ्यांनी मुळा पिकाची लागवड केली आहे.
दीड महिन्यात ५० हजार रुपयांचे उत्पन्न
गेल्या दीड महिन्यात ५० हजार रुपयांचे उत्पन्न मुळा विक्रीतून येथील शेतकऱ्यांना मिळाले आहे. मुळा पिकाची लागवड करण्यासाठी येथील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील एक एकरात ट्रॅक्टरच्या साह्याने ‘रोटाव्हेटर मशीनद्वारे जमीन भूसभूसशीत केली. त्यानंतर बैलजोडीच्या साह्याने जमिनीची मशागत करून दोन ते तीन इंचाच्या अंतरावर मजुरांच्या साह्याने पीक लागवड केली, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
‘कलश’ वाणाला शेतकऱ्यांची पसंती
सद्य:स्थितीत येथील शेतकरी बाजारात नवीन व चांगली असलेली वाण खरेदीला पसंती देत आहेत. ‘कलश’ हा वाण चांगला असल्याने या वाणाच्या बियाणाची लागवड केल्यास मूळा लांब, वजनदार, पांढरा शुभ्र व खाण्यास गूळचट, रूचकर असा उत्पादीत होतो. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी मुळा लागवडीपूर्वी कलश वाण खरेदी केला. पूर्वी या भागात ‘पुसा’ व ‘नॅशनल’ वाण मुळा लागवडीसाठी वापरले जात होते. परंतु, या दोन्ही वाणामुळे मूळा तिखट व कडक तयार होत होता. त्याला बाजारात भाव मिळत नव्हता. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी ‘कलश’ वाण खरेदी करून मुळा लागवड केली.
तीन टप्प्यात मूळ्याची काढणी
लागवडीनंतर ४५ ते ५० दिवस झाल्यानंतर मूळा तीन टप्प्यात काढला जातो. जो मूळा मोठा व पालदार आहे. असा मुळा मजुरांच्या साह्याने काढला जातो. त्यानंतर लहान आकाराचा मुळा व तिसऱ्या टप्प्यात चार ते पाच दिवसाआड शेतात राहिलेला मुळा काढला जातो.
१० ते १५ रुपये किलो भाव
कापडणे येथून दररोज रात्री नऊ वाजता ट्रकमध्ये भरून कांदा सुरत येथे रवाना होतो. सुरत येथील सर्वात मोठ्या सरदार मार्केटला मुळा विकला जातो. सद्य:स्थितीत येथील मार्केटला १० ते १५ रुपये किलो याप्रमाणे मूळ्याची विक्री होत आहे. दीड महिन्याचे हे पीक असल्यामुळे एका एकरमध्ये उत्पादीत झालेल्या मूळ्याला एक ते सव्वा लाखाचे उत्पादन प्राप्त होत असल्यामुळे शेतकरी समाधानी दिसत आहे.
आमचा मुळा सुरत मार्केटला पाठवतो. दोन रुपये किलो प्रमाणे गाडी भाडे मी देतो. आमच्या शेतातील एका एकरात दीडशे क्विंटल मूळा निघाला असून त्यातून आम्हांला ९० हजार रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. त्यात ४० हजार रुपये उत्पादन व वाहतूक खर्च विचारात घेता, ५० हजार रुपयांचा नफा मला झाला आहे.
- नारायण माळी, शेतकरी
गेल्या दोन दिवसांपासून सुरत येथील मार्केटमध्ये मूळा १० ते १२ रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे आम्ही समाधानी आहोते.
- विलास पाटील, शेतकरी
मुळ्याला सुरत येथे जो भाव मिळत आहे. तो अजुनही कमी असून अजून भाव मिळणे अपेक्षित आहे.
- हिंमत माळी, शेतकरी