कारच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार
By अतुल जोशी | Published: January 23, 2024 09:15 PM2024-01-23T21:15:29+5:302024-01-23T21:15:43+5:30
रात्री उशीरापर्यंत शिरपूर तालुका पोलिस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.
धुळे: दुचाकी आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोनजण जागीच ठार झाले , तर कार चालक जखमी झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तालुक्यातील बोराडी ते सांगवी रस्त्यावरील होऱ्यापाणी फट्याजवळ झाला. देवीदास भटा पाटील (वय ५४) व कैलास राघो कोळी (वय ४५, दोघे रा. हिसाळे,ता. शिरपूर) अशी मयतांची नावे आहे.
बोराडी-सांगवी रस्त्यावरील होऱ्यापाणी फाट्याजवळ रस्त्याच्या एका वळणावर बोराडीकडून सांगवीकडे जाणारी दुचाकी व सांगवीकडून चोंदीकडे जाणारी कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जबरदस्त होते की देवीदास पाटील, व कैलास कोळी हे जागीच ठार झाले. दोघेही वन विभागात वन मजूर म्हणून काम करीत होते़ काही कामानिमित्त ते बोराडीकडे गेले होते असे सांगण्यात आले.
अपघात झाल्याचे वृत्त लवकर न कळल्याने दोघे दुचाकी स्वार रस्त्यावर पडून होते़ त्यानंतर त्या मार्गावर ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांनी सांगवी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिस लागलीच घटनास्थळी दाखल झाले़ जखमी कारचालक गोविंद कालूसिंग पावरा (वय २२, रा. जुनापाणी,ता.शिरपूर) याला उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले़ तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. तर दोघांचे मृतदेह येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत शिरपूर तालुका पोलिस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.