साक्री पं.स.चे दोन लाचखोर जाळयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 05:50 PM2018-09-11T17:50:39+5:302018-09-11T17:54:13+5:30
एसीबीची कारवाई : दोन हजाराची लाच मागितली
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : उपशिक्षकाचे वैद्यकीय रजेचे वेतन आणि रजा मंजुरीची रक्कम काढून देण्याच्या प्रक्रियेसाठी दोन हजाराच्या लाचेची मागणी करणाºया साक्री पंचायत समितीतील दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले़ ही कारवाई मंगळवारी झाली़ या घटनेमुळे खळबळ उडाली आहे़ त्या दोघांविरुध्द साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला़
तक्रारदार हे जिल्हा परिषदेच्या शाळेत उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत़ सन २०१७ मध्ये त्यांचा अपघात झाला होता़ त्यांचे वैद्यकीय रजेचे वेतन (पगार) बिल आणि रजा मंजुरीसाठी साक्री पंचायत समिती येथील कार्यालयात प्रलंबित होते़ साक्री पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील लिपीक नंदकुमार रामदास खैरनार (४५) आणि वित्त विभागाचे सहायक लेखाधिकारी प्रदीप हरीभाऊ साबळे (५७) यांनी वैद्यकीय रजेचे पगार बिल काढून देण्याच्या प्रक्रियेसाठी तक्रारदारांकडे ३ हजाराच्या लाचेची मागणी केली. हे प्रकरण गेल्या ८ महिन्यांपासून पैशांसाठी प्रलंबित होते़ त्यामुळे तक्रारदार यांनी ३१ आॅगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती़
या प्रकरणाची पडताळणी केली असता तडजोडीअंती २ हजाराच्या लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले़ त्यानुसार सापळा लावण्यात आला होता़ पण, दोघांना संशय आल्याने लाचेची रक्कम स्विकारली नव्हती़ त्यानंतर मंगळवार ११ सप्टेंबर रोजी सहायक लेखाधिकारी प्रदीप हरीभाऊ साबळे यांना साक्री पंचायत समिती येथून आणि शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक नंदकुमार रामदास खैरनार यांना जिल्हा परिषदेतून ताब्यात घेण्यात आले़ या दोघांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक (सुधारणा) कायदा सन २०१८ चे कलम ७ अन्वये साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला़
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले, महेश भोरटेकर आणि त्यांच्या पथकातील नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, सुधीर सोनवणे, संदिप सरग, सतिष जावरे, कैलास जोहरे, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, शरद काटके, प्रकाश सोनार, संदिप कदम, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली़