दोन दिवसांचा लॉकडाउन अखेर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 10:20 PM2020-04-19T22:20:09+5:302020-04-19T22:20:37+5:30

मनपातर्फे रविवारी रात्री निर्णय जाहीर, शासन आदेशाची अंमलबजावणी कायम, अत्यावश्यक सेवा सुरळीत राहणार

The two-day lockdown is finally back | दोन दिवसांचा लॉकडाउन अखेर मागे

दोन दिवसांचा लॉकडाउन अखेर मागे

googlenewsNext

धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी महापालिकेतर्फे प्रायोगिक तत्वावर १९ प्रभागात २० व २१ एप्रिल असे दोन दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. त्यादृष्टीने तयारीही करण्यात आली होती. मात्र प्रशासनाच्या नवीन अधिसुचनेनुसार सदरचा लॉकडाऊन रात्री मागे घेण्यात आल्याची माहिती आयुक्त अजिज शेख यांनी दिली़
मालेगाव, साक्री, तसेच जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून खबरदारी म्हणून विविध उपाय-योजना राबविल्या जात आहे़ त्या पार्श्वभुमीवर धुळे शहर कोरोना मुक्त ठेवण्यासाठी तसेच भविष्यात एखादा कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्यास खबरदारी म्हणून शहर लॉकडाउन ठेवण्याचा निर्णय प्रायोगिक तत्वावर घेण्यात आला होता़ त्यासाठी सोमवार व मंगळवार असे दोन दिवस शहरात लॉकडाउनची अंमलबजावणी होणार होती.
रात्री उशिरा शासनाचे निर्देश
तथापी शासनाने लॉकडाऊन संदर्भात नवीन सर्वसमावेशक अधिसूचना जारी केलेली आहे. त्यामध्ये नमूद केलेल्या भाजीपाला, फळविक्री, मटन, चिकन, मासे विक्री, औषधी विक्री, दूध विक्री अशा अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहे़ सदरील निर्देश विचारात घेऊन मनपाकडून लागू केलेला दोन दिवसांचा लॉकडाउन मागे घेतल्याचा निर्णय रात्री ९ वाजेच्या सुमारास जाहीर करण्यात आला.
अन्य नियम तसेच राहतील
कोरोना विषाणूमुळे उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादूर्भाव व नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवळी निर्गमित केलेले व प्रचलित असलेले आदेश व मार्गदर्शक सूचना कायम राहणार आहेत़ त्यास प्रमाणे ३ मे पर्यत लॉकडाउन ठेवण्याचे आदेश ही कायम राहणार आहे़ या कालावधीत नागरिकांनी सोशल डिस्टिन्सिंग, तोंडाला मास्क, रूमाल बांधणे आदीचे पालन करावे असेही आयुक्त अजिज शेख यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे़
आस्थापने सुरू राहतील
लॉकडाऊनच्या दोन दिवसात शहरातील सर्व दुकाने बंदचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र नव्याने आदेश प्राप्त झाल्याने सोशल डिस्टन्स ठेवून नागरिकांनी लागू असलेल्या नियमानुसार खरेदी करू शकता़
कॉलनीतील सीमा बंद
लॉकडाऊनच्या निर्णयामुळे रविवारी सीमा बंद करण्यात आल्या आहेत़ तर नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
आरोग्य तपासणी
लॉकडाऊनच्या कालावधीत मनपा आरोग्य विभागामार्फेत नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे़ त्यासाठी सोमवारी सकाळी ८ वाजेपासून घरोघरी जावून थर्मल यंत्राव्दारे तपासणी केली जाणार आहे़ तपासणी दरम्यान संशयित रूग्ण आढळून आल्यास त्यांची माहिती आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येणार आहे़तर लॉकडाऊन दरम्यान प्रभागात फवारणी देखील केली जाणार आहे़

Web Title: The two-day lockdown is finally back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे