दोन दिवसांसाठी जुनेधुळे संपूर्ण लॉकडाउन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:24 PM2020-04-14T22:24:59+5:302020-04-14T22:25:28+5:30
पायलट प्रोजेक्ट : कोरोनाच्या अनुषंगाने आयुक्तांनी घेतला तडकाफडकी निर्णय, नियोजन पूर्ण
धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आलेला आहे़ त्याची मुदत ३ मे पर्यंत वाढविण्यात आलेली आहे़ या अनुषंगाने कठोर निर्णय घेत जुने धुळे परिसर, मच्छिबाजार, मौलवीगंज या भागात १५ आणि १६ एप्रिल असे दोन दिवस संपूर्ण लॉकडाउन करण्यात येणार आहे़ आयुक्त अजीज शेख यांनी हा निर्णय घेतला असून स्थानिक नगरसेवक आणि अधिकारी यांना देखील याची माहिती बैठकीच्या माध्यमातून देण्यात आली़ दरम्यान, हा पायलट प्रोजेक्ट आहे़ भविष्यात संपुर्ण धुळ्यात हा प्रोजेक्ट राबविला जावू शकतो़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात लॉकडाउन जाहीर झालेला आहे़ हा कालावधी राज्यात ३० एप्रिलपर्यंत आणि देशात ३ मे पर्यंत वाढविण्यात आलेला आहे़ कोरोनाचा प्रसार धुळे जिल्ह्याच्या सरहद्दीपर्यंत येऊन पोहचला आहे़ त्यामुळे महापालिका प्रशासन अधिकच दक्ष झालेले आहे़ यदाकदाचित भविष्यात शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यास आणि एखाद्या भागात संपुर्णत: लॉकडाउन करण्याची स्थिती निर्माण झाल्यास कशाप्रकारे उपाययोजना आणि कार्यवाही करता येऊ शकेल यासाठी महापालिका मार्फत पूर्वतयारीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे़
यात शहरात प्रायोगिक तत्वावर रंगीत तालीम म्हणून शहरातील जुने धुळे परिसर, मच्छिबाजार, मौलवीगंज या भागात १५ आणि १६ एप्रिल असे दोन दिवस संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे़ तथापी या दोन दिवसात त्या भागातील नागरीकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा घरपोच होण्यासाठी त्या भागातील अशा वस्तू पुरवठा करणाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक, वस्तू वाटप करणाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक घेण्यात आलेले आहे़ या भागातील नागरीकांना कळविण्यात आले आहे़ संबंधित भागातील नगरसेवकांशी संपर्क करुन त्यांना याबाबत अवगत करण्यात आले आहे़ टप्प्या टप्प्याने शहरातील विविध भागात विशिष्ठ कालावधीसाठी लॉकडाउनची कारवाई करण्यात येणार आहे़
ही कार्यवाही एक पायलट प्रोजेक्ट आहे़ जेणे करुन भविष्यात अशा प्रकारच्या लॉकडाउनची गरज निर्माण झाल्यास नागरीकांची मानसिक तयारी असावी़ प्रशासनालाही त्यादृष्टीने उपाययोजना व योग्य अशी कार्यवाही करणे सुलभ होऊ शकेल़ यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे़
बैठकीत नगरसेवकांची आणि अधिकाºयांची विविध मते देखील जाणून घेण्यात आली़
अधिकाºयांकडून आढावा, रस्तेही अडविले
संपूर्ण प्रभागात शिरकाव होणाºया ठिकठिकाणचे रस्ते अडवण्यात आलेले आहे़ याच बरोबर सदर भागात थर्मल मिटर यंत्राद्वारे प्रत्येक कुटुंबात मनपाच्या वैद्यकीय पथकामार्फत थर्मल स्कॅनिंग तपासणी करण्यात येणार आहे व संपूर्ण भागात स्प्रिंग मशीन द्वारे रसायन फवारणी ही करण्यात येणार आहे़
हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी व नियोजनाचा आढावा घेण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, तसेच चिन्मय पंडित, चंद्रकांत सोनार, अजीज शेख, वान्मथी सी, डॉ़ राजू भुजबळ, सचिन हिरे उपस्थित होते़ सर्वंकष चर्चा करण्यात आली़
हा पायलट प्रोजेक्ट आहे़ भविष्यात अशाप्रकारे १०० टक्के लॉकडाउनची गरज निर्माण झाल्यास आपली मानसिक तयारी असावी़ प्रशासनाला सुध्दा त्या दृष्टीने उपाययोजना आणि कार्यवाही करणे सुलभ व्हावे यासाठी असा निर्णय घेतला असून तो सर्वांच्या हिताचा असणार आहे़
- अजीज शेख, आयुक्त