दोन गटात हाणामारीने तणावपूर्ण वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:48 PM2018-04-01T12:48:35+5:302018-04-01T12:48:35+5:30
फागणे गावातील घटना : पोलिसात नोंद नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील फागणे गावात शनिवारी सायंकाळी उशिरा दोन गटात झालेल्या वादाचे पडसाद हाणामारीत उमटले़ झोंबाझोंबी झाल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते़ मात्र, रविवारी दुपारपर्यंत घटनेची कोणतीही नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात झालेली नव्हती़
नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर फागणे हे गाव धुळे तालुक्यातील संवेदनशिल म्हणून परिचित आहेत़ यापुर्वी सण उत्सवाच्या काळात अनेकवेळा दोन गटात वाद झाले आहेत़ शाब्दिक वादाचे पडसाद हाणामारीत देखील उमटले आहेत़ लाठ्या-काठ्यांसह लोखंडी पाईप आणि तलवारीचा देखील सर्रासपणे वापर झालेला आहे़ त्यामुळे धुळे तालुका पोलिसांचे या गावाकडे आणि गावातील हालचालींकडे बारीक लक्ष असते़
गावात सायंकाळच्या वेळेस बहुतेक ठिकाणी, चौका-चौकात गप्पांचा फड रंगलेला असतो़ अशाच गप्पांचा फड रंगलेला असताना शनिवारी सायंकाळी उशिरा अचानक दोन गटात वाद झाला़ क्षणार्धातच त्याचे रुपांतर हाणामारीत झाल्याने त्या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ यावेळी तलवारी, लोखंडी पाईप काढण्यात आले होते़ वस्तुत: असा कोणताही प्रकार गावात घडला नसल्याचे रविवारी दुपारी समोर आले़ तलवारीसारख्या कोणत्याही हत्यारांचा वापर झाला नसून किरकोळ स्वरुपाचा वाद झाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले़ परिणामी हत्यार निघाल्याची शेवटी अफवाच ठरली़ ही अफवा मात्र वाºयासारखी पसरली होती़ शनिवारी सायंकाळी उशिरा हा प्रकार झाल्याने तणावपूर्ण वातावरण रविवारी देखील कायम होते़ रविवारी दुपारपर्यंत धुळे तालुका पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद घेण्यात आलेली नव्हती़