शिक्षकाची लूट करणारे दोन सराईत एलसीबीच्या जाळ्यात
By देवेंद्र पाठक | Published: March 24, 2023 08:51 PM2023-03-24T20:51:17+5:302023-03-24T20:51:25+5:30
मालेेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथून धुळ्याकडे येणाऱ्या निवृत्त शिक्षकाची लूट केल्याप्रकरणी मालेगावच्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.
धुळे :
मालेेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथून धुळ्याकडे येणाऱ्या निवृत्त शिक्षकाची लूट केल्याप्रकरणी मालेगावच्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई झाली. अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.
देवपुरातील सुदर्शन काॅलनीत राहणारे निवृत्त शिक्षक मगन बाळू पाटील (वय ६१) हे १७ मार्च रोजी चंदनपुरी येथून मोटारसायकलीने धुळ्याकडे येत हाेते. मुंबई आग्रा महामार्गावर पुरमेपाडा शिवारात शिवशक्ती हाॅटेलजवळ त्यांना दोन जणांनी अडविले. शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रकमेसह इतर साहित्य घेऊन त्यांनी पोबारा केला. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्याची खातरजमा करुन भगवान सिताराम करगळ (वय ३०, रा. सावडगाव ता. मालेगाव) आणि विठोबा रामचंद्र बाचकर (वय ४०, रा. टिपे ता. मालेगाव) या सराईत दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ७० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली, २ हजाराचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, एलसीबी पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, कर्मचारी योगेश राऊत, संजय पाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, श्रीशैल जाधव, अमोल जाधव, विनोद पाठक, योगेश ठाकूर, कैलास महाजन उपस्थित होते. दोघेही सराईत असून त्यांच्याविरोधात १० गुन्हे दाखल आहेत.