कार-लक्झरीबस अपघातात एक ठार दोन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 04:33 PM2018-04-11T16:33:08+5:302018-04-11T16:33:08+5:30
झोडगे गावाजवळील घटना, अपघाताचा गुन्हा दाखल
आॅनलाइन लोकमत
धुळे : कार व लक्झरी बस यांच्यात झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर अन्य दोनजण जखमी झाले. हा अपघात ११ रोजी पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास मुंबई- आग्रा महामार्गावरील झोडगे गावाजवळील हॉटेल गिलजवळ झाला. जखमींवर मालेगाव येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहरातील राणा ट्रान्सपोर्टचे मालक प्रशांत पुनमचंद राठोड, जळगाववाला कुल्फी सेंटरचे मालक शेखर स्वरूप परदेशी, व देवपुरातील हॉटेल शांतीचे मालक तथा मल्ल गिरीश राजाराम चौधरी हे कामानिमित्त कारने (क्र. एमएच २०-बीसी २०९५) मालेगावला गेले होते. तेथून परतत असतांना झोडगे गावाजवळ त्यांच्या कारला समोरून आलेल्या ट्रॅव्हल्सने (क्र. एमपी ३०- पी ०९९०) जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा चक्काचुर झाला. या अपघातात प्रशांत राठोड (४७, रा.धुळे) हे जागीच ठार झाले. तर शेखर परदेशी व गिरीश चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ मालेगाव येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे. तपास एएसआय भदाणे करीत आहेत.
दरम्यान या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने दूर केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.