डिक्कीतून लांबविली पावणे दोन लाखाची रोकड; साक्री येथील घटना, चोरीचा गुन्हा दाखल
By देवेंद्र पाठक | Published: October 7, 2023 04:18 PM2023-10-07T16:18:27+5:302023-10-07T16:18:43+5:30
जिभाऊ हाबा मारनर (वय ५०, रा. पेरेजपूर, ता. साक्री) यांनी फिर्याद दाखल केली.
धुळे : बडोदा बँकेतूून १ लाख ७० हजारांची रोकड काढल्यानंतर दुचाकीच्या डिक्कीतून ठेवण्यात आली. घरी जात असताना कोणीतरी ही रक्कम शिताफीने काढून घेतल्याची घटना साक्री येथे २६ सप्टेंबर रोजी सकाळी घडली होती. सर्वत्र शोध घेऊनही रक्कम मिळून आली नाही. याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी साक्री पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
जिभाऊ हाबा मारनर (वय ५०, रा. पेरेजपूर, ता. साक्री) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार जिभाऊ यांचा मुलगा याेगेश मारनर याच्या नावाने बँक ऑफ बडोदा येथे खाते आहे. जिभाऊ यांनी बँकेतून १ लाख ७० हजारांची रक्कम काढली. त्यांनी हे पैसे एका पिशवीत ठेवले. पैशाची पिशवी दुचाकीच्या लाॅक नसलेल्या डिक्कीत ठेवली. त्यानंतर घरी जात असताना कोणीतरी डिक्कीतून पैशाची पिशवी लांबविली.
चोरीची ही घटना बँक ऑफ बडोदापासून ते देऊनगर पेट्रोलपंप यादरम्यान २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते पावणे बारा वाजेच्या दरम्यान घडली. डिक्की उघडी असल्याचे लक्षात येताच पिशवी असल्याची खात्री करण्यात आली असता, पैशाची पिशवी दिसून आली नाही. चोरी झाल्याचे लक्षात येताच सर्वत्र शोध घेण्यात आला. अनेकांकडे विचारपूसदेखील करण्यात आली. त्याचा काही उपयोग न झाल्याने शुक्रवारी साक्री पोलिस ठाण्यात सायंकाळी फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.