कृषिसेवा केंद्रातून लांबविला पावणेदोन लाखांचा ऐवज
By अतुल जोशी | Published: December 1, 2023 06:06 PM2023-12-01T18:06:17+5:302023-12-01T18:06:37+5:30
शिरपूर तालुक्यातील तरडी गावातील घटना, पोलिसात गुन्हा
अतुल जोशी, धुळे, शिरपूर: कृषिसेवा केंद्राच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्याने कीटकनाशक औषधांसह रोख रक्कम असा १ लाख ६२ हजार ३०० रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना शिरपूर तालुक्यातील तरडी गावात गुरुवारी पहाटे घडली. या प्रकरणी थाळनेर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरपूर तालुक्यातील तरडी चंद्रकांत भालेराव पाटील (वय ५४) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शिरपूर तालुक्यातील तरडी गावात त्रिमूर्ती कृषिसेवा केंद्र नावाचे कीटकनाशक औषधांचे दुकान आहे. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून पाटील घरी गेले. मध्यरात्री कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने दुकानाच्या शटरला लावलेले कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. शोधाशोध करून कीटकनाशक औषधांचा साठा आणि दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम असा एकूण १ लाख ६२ हजार ३०० रुपयांचा ऐवज लुटून चोरट्याने पळ काढला. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास घडली.
३० रोजी नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी पाटील आले असता, दुकानाला लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. दुकानात जाऊन पाहणी केली असता, दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती थाळनेर पोलिसांना कळविली. या प्रकरणी ३० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.