धुळ्यात पेट्रोल टाकून दोन दुचाकी जाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 04:02 PM2018-05-02T16:02:32+5:302018-05-02T16:02:32+5:30
५ ० हजाराचे नुकसान, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील आग्रारोडवरील एका कापड दुकानासमोर असलेल्या दोन दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिल्यात. तसेच दुकानासमोर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडून, घराच्या गॅलरीला आग लावल्याची घटना १ रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी आझादनगर पोलीस स्टेशनला दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शहरातील आग्रारोडवर परिधान ड्रेसेस हे कपड्यांचे दुकान आहे. या दुकानावर दोन तरूण लहान मुलांचे कपडे घेण्यासाठी आले होते. ७०० रूपयांचे कपडे खरेदी केल्यावर त्यांनी दुकानमालकाला ५०० रूपयातच कपडे द्यावे असे सांगितले. मात्र दुकानमालकाने त्यास नकार दिला. त्याचा राग येवून त्या दोघांनी दुकानमालकासह कर्मचाºयांना दमदाटी करून निघून गेले.
त्यानंतर ते तरूण पुन्हा १ रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास परिधान ड्रेसेस दुकानावर आले. त्यांनी दुकानावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. तसेच दुकानासमोर असलेल्या दोन दुचाकींवर (क्र.एमएच १८-अेव्ही ४५३९, व एमएच १८- अेव्ही ५३१७) पेट्रोल टाकून त्या जाळून टाकल्या. तसेच घराच्या गॅलरीलाही आग लावली. हा सर्व प्रकार दुकान मालक आनंद श्रीश्रीमाळ यांनी घराच्या गच्चीवरून पाहिला. त्यांनी लागलीच अग्निशमनदलाला फोन केला. अग्निशमनदलाच्या दोन बंबानी आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र आगीत दुचाकींचा कोळसा झाला. तर दुकानाच्या काचेला तडा गेला. दुकान मालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. आगीत ५० हजाराचे नुकसान झाल्याची नोंद पोलीस स्टेशनला करण्यात आलेली आहे.
या प्रकरणी आनंद श्रीश्रीमाळ यांनी आझादनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून भैय्या चौधरी व अन्य एकजण अशा दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जी.यू. नागलोक करीत आहेत.