पिंपळनेर येथून बेपत्ता झालेल्या दोन मुली मनमाडला सापडल्या; नाशिक येथून परतत असताना घडली घटना

By देवेंद्र पाठक | Published: September 11, 2022 10:17 PM2022-09-11T22:17:30+5:302022-09-11T22:19:28+5:30

मनमाड रेल्वे पोलिसांना मिळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पथकाने पहाटेच्या सुमारास पिंपळनेर पोलीस ठाण्यात आणले आणि शिक्षकांकडे सुपुर्द केले.

two missing girls from pimpalner found in manmad incident happened while returning from nashik | पिंपळनेर येथून बेपत्ता झालेल्या दोन मुली मनमाडला सापडल्या; नाशिक येथून परतत असताना घडली घटना

पिंपळनेर येथून बेपत्ता झालेल्या दोन मुली मनमाडला सापडल्या; नाशिक येथून परतत असताना घडली घटना

Next

पिंपळनेर : अक्कलकुवा येथील एका विद्यालयातील विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातील खेडेगाव येथून कबड्डी स्पर्धा खेळून परत येत असताना पिंपळनेर बसस्थानक येथून त्या दोन विद्यार्थिनी हरविल्या. ही घटना शनिवारी दुपारी घडली. पिंपळनेर पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे आणि पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे यांनी तपासाची चक्रे फिरविली. त्या मुली मनमाड रेल्वे पोलिसांना मिळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पथकाने पहाटेच्या सुमारास पिंपळनेर पोलीस ठाण्यात आणले आणि शिक्षकांकडे सुपुर्द केले.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील एका विद्यालयाच्या मुले व मुलींच्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ७ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील खेडेगाव येथे या स्पर्धा होत्या. ३ शिक्षकांसह २८ विद्यार्थी यात सहभागी झाले होते. स्पर्धा आटोपून अक्कलकुवा येथे परतीसाठी शनिवार १० सप्टेंबर रोजी महामंडळाच्या एमएच २० बीएल ४२४७ या क्रमांकाच्या वडाळीभोई - नंदुरबार या बसने ते सर्व निघाले. पिंपळनेर येथे बस थांबली. बसमधून दोन मुली व शिक्षिका लघुशंकेसाठी खाली उतरल्या. परत बसमध्ये बसले असता शिक्षकांनी बसमधील मुले-मुलींची संख्या मोजली, तेव्हा दोन मुली कमी आढळल्या. तेव्हा या दोन मुलींना बसस्थानक परिसरात शोधण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेराही तपासण्यात आला. सटाणा रस्त्यावर तसेच गावात बाजारपेठेत व इतर ठिकाणी शोध घेण्यात आला. दिवसभर त्या कुठेच आढळून आल्या नाहीत. पोलिसांच्या मदतीने ही शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत. याप्रकरणी पोलिसात हरविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी पोलीस ठाण्यात थांबून होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे आणि पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे यांनी तपासाची चक्रे फिरविली. त्या मुलींचे फोटो पोलीस अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर पाठविले. जवळपासच्या सर्वच पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला. रेल्वे पोलिसांशी ही संपर्क साधला असता मनमाड रेल्वे पोलिसांना दोन मुली आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या मुली त्याच असल्याची खात्री झाल्याने साळुंखे यांनी पोलिसांचे पथक पाठवून त्या मुलींना पहाटे पिंपळनेर पोलीस ठाण्यात आणले आणि शिक्षकांकडे सुपुर्द केले.
 

Web Title: two missing girls from pimpalner found in manmad incident happened while returning from nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.