दिनू डॉनसह दोन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:27 PM2019-03-15T22:27:28+5:302019-03-15T22:27:52+5:30
स्पिरीटचा टेम्पो पकडला : दोघे फरार, बारापत्थर चौकातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : बनावट दारु बनविण्यासाठी उपयोगात येणाºया स्पिरीटने भरलेला टेम्पो शहर पोलिसांच्या पथकाने बारापत्थर चौकात शुक्रवारी दुपारी सापळा लावून पकडला़ टेम्पोसह स्पिरीट असा एकूण १ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ याप्रकरणी शिरुडच्या दिनू डॉनसह टेम्पो चालकाला अटक करण्यात आली़ तर अन्य दोघे संशयित फरार झाले आहेत़
एमएच १८ एए ५००३ क्रमांकाचा टेम्पो शिरूड येथून धुळ्याकडे येत आहे़ यात बेकायदेशीररित्या बनावट दारु बनविण्याकामी उपयोगात येणारे स्पिरीट ठेवलेले प्लॅस्टिक ड्रम असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना मिळाली़ माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील, एम़ एच़ सैय्यद, नाना आखाडे, हिरालाल बैरागी, प्रकाश पाटील, मुक्तार मन्सुरी, कबीरोद्दीन शेख, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, सतिष कोठावदे, रविंद्र गिरासे, राहुल पाटील, तुषार मोरे, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी यांनी बारापत्थर चौकात सापळा लावला होता़ दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास शिरुड गावाकडून धुळ्याकडे येणारा एमएच १८ एए ५००३ क्रमांकाचा टेम्पो दाखल होताच तो अडविण्यात आला़ चालकाची चौकशी केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने टेम्पोची तपासणी करण्यात आली़ टेम्पोत ४२ हजार रुपये किंमतीचे ४०० लिटर सफेद रंगाचे स्पिरीट आणि १ लाख रुपये किंमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला़
याप्रकरणी दिनेश निंबा गायकवाड उर्फ दिनू डॉन (रा़ शिरुड ता़धुळे) आणि टेम्पो चालक सुनील महारु पाटील (रा़ नकाणे ता़ धुळे) या दोघांना अटक करण्यात आली़ तर या प्रकरणातील संशयित धनराज जितेंद्र शिरसाठ आणि सोनू उर्फ सोन्या नागराज पवार (दोघे रा़ धुळे) हे फरार झाले आहेत़