धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्यात अपघातांत दोनजण ठार
By अतुल जोशी | Published: July 12, 2023 06:33 PM2023-07-12T18:33:36+5:302023-07-12T18:33:48+5:30
याप्रकरणी संबंधित वाहनचालकांविरुद्ध पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
धुळे: जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोनजण ठार व दोनजण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित वाहनचालकांविरुद्ध पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
कंटेनरचे चाक निखळून पडल्याने दुचाकीवरील मुलगा ठार
सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एजाज मुसा बागवान (वय ५३, रा. देवपूर, धुळे) हे परिवारासह दुचाकीने जात होते. त्याचवेळी नगावबारीजवळील सातपुडा हायस्कूलसमोरील उड्डाणपुलावरून जात असलेल्या कंटेनरचे (एचआर- ३९, ई- ७१७४) एक चाक निखळून पडले. ते चाक दुभाजक ओलांडून बागवान यांच्या दुचाकीला धडकले. चाकाच्या धडकेत एजाज बागवानसह त्यांची पत्नी रिजवानबी बागवान व मुलगा शादबा हे दुचाकीच्या खाली पडल्याने जखमी झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शादबा बागवान याचा मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. याप्रकरणी एजाज बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवपूर पोलिस स्टेशनला कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक चिंचोलीकर करीत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण ठार
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ३२ वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील तिसगाव ढंढाणे फाट्याजवळ ९जुलै रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. रमेश झेंडू सोनवणे (रा. धमाणे) याला शिरपूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात रमेश सोनवणे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचाासाठी रुग्णालयात दाखल केले असता, तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी राजाराम झेंडू सोनवणे यांनी ११ जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलिसांत अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली आहे.