बियर दिली नाही म्हणून चाकू हल्ला करणाऱ्यास दोन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा
By अतुल जोशी | Published: April 12, 2023 05:55 PM2023-04-12T17:55:05+5:302023-04-12T17:55:17+5:30
न्यायालयाने दोन वर्षांची सक्त मजुरी व १५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल सत्र न्यायाधीश एस.सी.पठारे यांनी दिला.
धुळे- बियरची मागणी करून ती दिली नाही म्हणून एकावर पाठीमागून येत चाकू हल्ला केल्याप्रकरणी आरोपी दीपक अनिल कुंभारे (वय २७,रा.धुळे) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षांची सक्त मजुरी व १५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल सत्र न्यायाधीश एस.सी.पठारे यांनी दिला.
जयेश विजय भोपे हे २३ मार्च १६ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास बिअरबार बंद करून मित्रासमवेत गप्पा करीत होते. त्यावेळी दीपक अनिल कुंभारे हा त्याठिकाणी आला. त्याने बियरची मागणी केली असता, भोपे यांनी दुकान बंद झाल्याचे सांगितले. त्यानंतर भोपे हे जात असताना आरोपीने पाठीमागून येत त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. यात ते जखमी झाले होते. याप्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
सुरवातीला हा खटला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चालला. यात ९ जणांची साक्ष नोंदविण्यात आली. मात्र गुन्हा सिद्ध न झाल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. यानिर्णयाविरूद्ध भोपे यांनी ॲड. नीलेश मेहता यांच्या मार्फत सत्र न्यायालयात अपील दाखल केले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भारत भोईटे यांनी युक्तीवाद केला. त्यामुळे सत्र न्यायाधीश एस.सी. पठारे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचा निकाल रद्द करून आरोपी दीपक अनिल कुंभारे यास दोन वर्षांची सक्त मजुरी व १५ हजार रूपये दंडाची शिक्षा १० एप्रिल २३ रोजी सुनावली. अतिरक्त सरकारी अभियोक्ता भोईटे यांना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एस.जे.मुरक्या, जगदीश सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.