जैताण्यात दोघा तरुणांचा शेतळ्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:00 PM2019-10-29T12:00:19+5:302019-10-29T12:00:42+5:30
सोमवारची घटना : ऐन दिवाळीत घडल्याने गावावर शोककळा
जैताणे : साक्री तालुक्यातील जैताणे येथील दोन युवकांचा शेततळ्यात बुडून दुर्देवी अंत झाल्याची दुर्घटना दिवाळी पहाटच्या दिवशीच घडली़ यामुळे गावावर ऐन दिवाळीत शोककळा पसरली़
साक्री तालुक्यातील जैताणे येथील देवमन गंगाराम खलाणे यांचा मुलगा खलाणे दुग्धालयाचे संचालक मच्छिंद्र देवमन खलाणे (वय ३४) व सामाजिक कार्यकर्ते लुका पाटील यांचा मुलगा सुनील लुका जाधव (वय ३०) हे दोन्ही मित्रांसमवेत दिवाळीच्या दिवशी शेतात गेले होते. त्यादरम्यान पाय घसरुन तोल गेल्याने देवमन खलाणे यांच्या मालकीच्या शेतात असणाºया शेततलावात दोन्ही तरुण पडले. सोबतच्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तलाव काठोकाठ भरला असल्याने तसेच शेततळ्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे कोणाही मित्रांना त्या दोघा तरुणांना सावरता आलेले नाही. गावात निरोप पोहोचल्याने नातेवाईक शेतात पोहचले. तोपर्यंत दोन्ही मृतदेह तरंगताना दिसत होते. दोघांना जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलीस पंचनाम्याननंतर दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन जैताणे येथे करण्यात आले़ रात्री ८ वाजता दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले़
मयत मच्छिंद्र खलाणे हा परिसरातील नामांकित दुग्धव्यवसायिक होता. तर सुनील जाधव हा एक मेहनती कष्टाळू शेतकरी होता. आपआपल्या क्षेत्रात कार्यरत असतानाच सुनील जाधव उर्फ भावड्या हा प्रत्येक सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन तरुणांमध्ये चैतन्य निर्माण करणारा कार्यकर्ता होता. दोन्ही युवकांचा समजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांमध्ये सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. कुठल्याही उत्सवाची कल्पना त्यांच्या शिवाय करणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे़
मयत सुनील हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी राणी, मुलगी मृणाली वय ८, मुलगा हितेश वय ५ असा परिवार आहे. तर मयत मच्छींद्र यांच्याही पश्चात पत्नी भावना मुलगी वर्षा वय ८ ,मुलगा हर्षल वय ५ असा परिवार आहे.