साक्रीनजीक अपघातात मामा-भाची ठार; मामीवर उपचार सुरू

By देवेंद्र पाठक | Published: September 10, 2023 02:55 PM2023-09-10T14:55:22+5:302023-09-10T14:55:54+5:30

पुलावरून कार कोसळल्याने घडली दुर्घटना

Uncle-niece killed in accident near Sakree of Dhule Treatment started on Mami | साक्रीनजीक अपघातात मामा-भाची ठार; मामीवर उपचार सुरू

साक्रीनजीक अपघातात मामा-भाची ठार; मामीवर उपचार सुरू

googlenewsNext

देवेंद्र पाठक, धुळे : भरधाव कार पुलावरून कोसळल्याने कारमधील मामा आणि भाची ठार झाल्याची घटना साक्रीनजीक शेवाळी रस्त्यावर शनिवारी घडली. साक्री पोलिस ठाण्यात शनिवारी सायंकाळी उशिरा अपघाताची नोंद झाली. अपघातात जखमी झाल्याने मामीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुभाष रुपला बागुल (वय ४०) आणि त्यांची भाची मोहिनी उर्फ चिऊ पांडुरंग साबळे (वय ३) असे मयत झालेल्यांची नाव आहे.

साक्री तालुक्यातील अंबोडे येथील सुभाष रुपला बागुल (वय ४०) आणि त्यांची पत्नी भारती सुभाष बागुल (वय ३८) हे भाची मोहिनी उर्फ चिऊ पांडुरंग साबळे (वय ३, रा. कुडाशी ता. साक्री) हिला घेऊन एमएच १८ एएल ९५२८ क्रमांकाची स्वत:ची कार घेऊन अंबोडे येथून धुळ्याकडे निघाले होते. धुळ्यात त्यांची दोन्ही मुले एका हॉस्टेल मध्ये वास्तव्यास आहे. पोळ्याची सुटी असल्याने ते मुलांना आपल्या गावी नेण्यासाठी धुळ्याकडे येत होते. शनिवारी सकाळी शेवाळी रस्त्यावर हॉटेल उदय पॅलेस जवळ पुलावरून जात असताना त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार पुलावरून थेट खाली कोसळली. या अपघातात कारमधील तिघांना गंभीर दुखापत झाली.

डोक्याला मार लागल्याने सुभाष बागुल हे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी भारती बागुल आणि भाची मोहिनी साबळे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना कारमधून बाहेर काढत धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. परंतु त्यांची भाची मोहिनी हिला मार लागल्याने रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच आपले प्राण सोडले. तर जखमी असलेल्या भारती यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी उशिरा साक्री पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Uncle-niece killed in accident near Sakree of Dhule Treatment started on Mami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात