पांझरेच्या पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 04:16 PM2019-04-10T16:16:21+5:302019-04-10T16:17:17+5:30

शेत शिवारातील रस्त्यांची वाट : वाळू चोरीला लगाम घालण्यात प्रशासनाला अपयश

 Unclean illegal sand extraction from Panzora's letter | पांझरेच्या पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा

dhule

Next

म्हसदी : साक्री तालुक्यातील दातर्ती, वसमार येथील पांझरा नदीपात्रातून रात्रं-दिवस होत असलेल्या वाळू चोरीला लगाम घालण्यात महसूल प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर महसूल व पोलीस प्रशासनाची नजर चुकवित भरधाव वेगाने धावणाऱ्या या वाळुच्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच या अवजड वाळुच्या वाहनांमुळे वसमार शेतशिवाराकडे जाण्याची रस्त्याची वाट लागली आहे.
दातर्ती, वसमार येथील पांझरा नदीपात्रातील वाळूला मोठी मागणी असते. यामुळे वाळू माफिया नदीपात्रात चांगलाच धूडगूस घालतांना दिसून येतात. पात्रात दिसेल तेथून रात्रं-दिवस वाळूचा बेसुमार अवैध उपसा सुरु आहे. यामुळे पांझरा नदीपात्रात पहावे तेथे मोठे-मोठे खड्डे पडलेले आहेत.
पांझरा नदीपात्रातून विनापरवाना होत असलेल्या वाळू चोरीमुळे पांझराकाठच्या गावातील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत असल्याने पांझराकाठच्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नदीपात्रातून होणारी ही वाळू चोरी रोखण्यासाठी पांझरा नदीकाठावरील ग्रामस्थांनी वारंवार महसूल प्रशासनाकडे तोंडी व लेखी स्वरुपात तक्रारी दिल्या आहेत. त्याच बरोबर तलाठ्यांनीही वाळू माफिया आमचे ऐकत नाहीत, कार्यवाही केल्यानंतरही वाळूचा बेसुमार उपसा होतो. यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. मात्र, विनापरवाना होणारी वाळू चोरी रोखण्यात महसूल प्रशासनाला आतापर्यंत यश आले नसल्याने महसूल प्रशासनाच्या भूमिकेवरच नागरिकांतून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तालुक्यातील दातर्ती, धमनार, वसमार, म्हसदी येथील पांझरा पात्रातून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. पोलीस व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेऊन वाळूमाफिया ही वाळू नाशिक जिल्ह्यांमध्ये पाठवित आहेत. अवैध वाळू उपशाला लगाम लावावा, अशी मागणी होत आहे.
महसूलच्या हालचालीवर पंटरची नजर
महसूल प्रशानाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वाळू माफियांनी रोजंदारीवर व्यक्ती (पंटर) नेमले आहेत. हे पंटर महसूल प्रशासनाच्या बारिक-सारिक हालचालींची माहिती वाळू माफियांना देत असल्याने वाळूची चोरी वाढली असल्याचे दिसत आहे. तहसील कार्यालय, समोरच्या चहा हॉटेलवर हे पंटर बसलेले असतात. बसस्थानक परिसरातील शेवाळी फाटकाजवळ, धमनार फाटा आदी ठिकाणी पंटरकडून माहिती दिली जात आहे. ही माहिती मिळाल्यास वाळूमाफिया आपली वाळूची वाहने तातडीने इतरत्र हलवित असल्यामुळे कार्यवाहीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या हाती काहीच लागत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनावर हे वाळूमाफिया वरचढ ठरत असल्याचे दिसत आहे.

Web Title:  Unclean illegal sand extraction from Panzora's letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे