वारसा दातृत्वाचा अंध गौरवचा पाणपोई उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:54 AM2019-04-28T11:54:11+5:302019-04-28T11:55:25+5:30
वारसा दातृत्वाचा अंध गौरवचा पाणपोई उपक्रम
- सुनील साळुंखे
शिरपूर शहरातील निमझरी नाक्याजवळील शिवशक्ती कॉलनीतील रहिवासी गौरव मोहनदास भामरे (३२) हे अंध असून ते वयाच्या ७व्या वर्षापासून पाणपोईचा उपक्रम राबवित आहे. त्याच्या उपक्रमाला आता २५ वर्ष पूर्ण होत आहे़ विशेष म्हणजे गौरव स्वत:चा वाढदिवस अनाथ, मुकबधीर व गरजु मुलांसोबत साजरा करीत असतो़ दिवाळीत फटाके न फोडता तो गरीब मुलांना फराळ व फटाके देतो़ अशा दातृत्ववान गौरवच्या पाणपोईस दररोज १० थंड पाण्याचे जार लागतात़
आपल्या कृतीने समाजासमोर आदर्श ठेवणाºया गौरवने वयाच्या सातव्या वर्षी आपल्या वाढदिवसापासून कडक उन्हात नागरिकांची तहान भागविण्यासाठी सुरूवातीला घराच्या ओट्यावर माठ-रांजण ठेवून एक पाणपोई उघडली, अन् तो स्वत: तहानलेल्यांना पाणी देवून त्यांना तृप्त करु लागला. त्याची ही परंपरा आजही अविरत सुरू आहे़ येथील बस आगारातील सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक एमक़े़ भामरे व यशवंत शाळेच्या मुख्याध्यापिका विजया भामरे यांचा तो एकुलता एक मुलगा आहे़ दोन्ही डोळ्यांनी तो अधू आहे़ त्याला दिवसातून ४-५ वेळा फिटही येतात. त्यामुळे वैयक्तिक जीवनात शारीरिक व्याधीने तो दु:खी असला तरीही त्याला सामोरे जावून स्वत:ला आनंद मिळविण्यासाठी विविध अभिनव उपक्रम राबवित असतो़
फिट येतात तेव्हा तो झाड उन्मळून पडावे तसा कोसळतो़ बºयाच वेळा डोके फुटते पण परोपकाराची कृती आहे म्हणूनच त्याच्या नावाने गौरव फाऊंडेशन ही सेवाभावी संस्था त्याच्या पित्याने काढून या माध्यमातून दिव्यांग व निराधार, अनाथांची सेवा सुरू आहे़ वृध्दांसाठी विविध शिबीरे देखील घेतली जातात़
स्वत:ला दिवाळीला फटाके फोडता येत नाही, त्याचा मनमुराद आनंद उपभोगता येत नाही म्हणून तो ५०० ते ७०० रूपयांचे फटाके आई-वडीलांना घ्यायला सांगतो अन् गरीब व गरजु मुलांना फटाके फोडावयास लावून आनंद मिळवितो़ शेजारी वा गल्लीत कोणी बालक आजारी पडल्याचे त्याला माहिती पडताच तो बिस्कीटपुडा घेवून त्या आजारी बालकाच्या घरी जाऊन देतो़ स्वत:चा वाढदिवस साजरा न करता गरजूंना जेवण देतो. झोपडीतील मुलांना कपडे वाटप तर कधी मुकबधीर मुलांना गोड जेवण देण्याचा उपक्रम तो राबवित असतो. स्वत:चे दु:ख विसरुन परोपकार करणाºया गौरवची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे.
प्रत्येकाची वाढदिवस साजरा करण्याची कल्पना वेगळी असते. अनेक जण धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करतात. गौरव मात्र, आपल्या वाढदिवशी अनाथ, गरजू व भिक्षेकयांना चक्क पार्टी देतो. ती केवळ पंगत नसते तर सामाजिक जाणिवेचे स्पंदन असते.