शेततळ्यात बुडून सात गुरांचा दुर्दैवी मृत्यू; शेतकऱ्यावर कोसळला दु:खाचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 06:51 PM2023-05-25T18:51:26+5:302023-05-25T18:51:38+5:30
शासनाने त्वरित याची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांच्यासह शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
राजेंद्र शर्मा
नेर (धुळे) : नेरजवळील शिरधाने गावात गुरांसाठी पाणी टंचाई भासत असल्यामुळे शेतात बैलगाडीला बांधून गुरांना पाणी पिण्यासाठी घेऊन गेले असता शेततळे पाहून बैलांनी धाव घेतल्याने दोन बैलांसह, दोन दुधाळ गायी आणि अन्य गुरांचा अशा सात गुरांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नेर जवळील शिरधाने प्र नेर येथे घडली. सुदैवाने प्रसंगावधन राखत शेतकऱ्याने बैलगाडीतून उडी मारल्याने तो वाचला. तर सुमारे चार ते पाच लाखांच्या गुरांचा डोळ्यादेखत बुडून मृत्यू झाल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात आश्रू तराळले.
नेरपासून जवळच असलेल्या शिरधाने येथील शेतकरी दिलीप पिंपळे यांचे गावापासून दोन ते तीन किलोमीटरवर शेत आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने गावात पाणीटचाई जाणवत आहे. यामुळे शेतात गुरांसाठी पाण्याची सोय केल्याने तेथेच रोज गुरांना घेऊन जात पाणी पाजले जाते. बुधावारीही गुरांना पाणी पाजण्यासाठी उशीर झाल्याने दिलीप पिंपळे हे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बैलगाडी घेऊन दोन दुधाळ गायींसह अन्य तीन गुरे घेऊन शेतात गेले. पण कडक उन्हामुळे बैलांना अधिक तहान लागल्याने शेतात बैल गाडी आल्यावर त्यांनी शेततळ्याकडे धाव घेतली.
त्यांनी थेट गाडीसह गुरांना घेऊन शेततळ्यात धाव घेतल्याने त्यातील गाळात रुतून त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तर दिलीप पिंपळे यांनी प्रसंगावधान राखत बैलगाडीतून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला. पण आपल्या बैलगाडीसह गुरांना डोळ्यात देखत बुडताना पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजारील शेतकऱ्यांनी त्यांच्या आरोळ्या ऐकून थेट त्यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. अखेर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी शेततळ्यात उतरून बैलगाडीसह सातही गुरांना मृत अवस्थेत बाहेर काढले. याची पोलिसांना, पशुवैद्यकीय अधिकारी आणि महसूल विभागाला माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामे केले. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर दोन बैल, दोन गोरे आणि दुधाळ गायींचा मृत्यू झाल्याने शेतकरी दिलीप पिंपळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, शासनाने त्वरित याची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांच्यासह शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.