'जोपर्यंत रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत टोपी काढणार नाही'
By महेश गलांडे | Published: December 25, 2020 04:36 PM2020-12-25T16:36:55+5:302020-12-25T16:37:27+5:30
जोपर्यंत रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असं आव्हानच अब्दुल सत्तार यांनी केलंय. धुळ्यातील शिवसेना मेळाव्यात बोलताना सत्तार यांनी भाजपावर जोरदार टीका केली.
धुळे - कोरोनाच्या सावटातही राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं स्थानिक निवडणुकांतही याचा प्रभाव दिसणार असून भाजपा विरुद्ध तिन्ही पक्ष अशीच लढाई आहे. तरीही स्थानिक पातळीवरील गटातटांचं राजकारणही लक्षणीय ठरणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिवसेना मेळाव्यात महसूल व ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंना लक्ष्य केलंय.
जोपर्यंत रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असं आव्हानच अब्दुल सत्तार यांनी केलंय. धुळ्यातील शिवसेना मेळाव्यात बोलताना सत्तार यांनी भाजपावर जोरदार टीका केली. भाजपाचे राजकारण म्हणजे मुँह मे राम बगल मे सुरी असंच आहे, राम मंदिराच्या नावाखाली भाजपाचं राजकारण सुरूय, असे सत्तार यांनी म्हटले. तसेच, आगामी ग्रामपंचायत निवडणुका ह्या केवळ निवडणुका नसून भाजपाल धडा शिकवण्याची संधी असल्याचे समजून कामाला लागा, असे आवाहनही सत्तार यांनी कार्यकर्त्यांना केलंय.
सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्याचा उच्चार करत, ते म्हणाले पण परत आलेच नाही, असे म्हणत फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचं भाजपा नेत्यांकडून खासगीत कौतुक केलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर, महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेनं त्यांना मंत्रीपदाची जबाबदारी दिली.