बेमोसमी पावसाने धुळे शहराला झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 11:08 PM2019-12-12T23:08:46+5:302019-12-12T23:09:05+5:30
१५ मिनीटांच्या सरी : खांब वाकले, वृक्षांच्या फांद्या तुटल्या, बाजार समितीत कांद्यासह मका भिजला
धुळे : बेमोसमी पावसाने शहराला चांगलेच झोडपून काढले़ दुपारी २ वाजेच्या सुमारास आलेल्या १५ मिनीटांच्या पावसाने सर्वांचीच दाणादाण उडवली होती़ बाजार समितीत दाखल झालेला कांदा, मका पावसात भिजल्याने लाखो रुपयांचा फटका शेतकºयांसह व्यापाºयांना सहन करावा लागला़ एकंदरीत पाहता या पावसाने केवळ धुळ्यातच हजेरी लावली आहे़ शिंदखेडा, साक्रीसह शिरपूर तालुक्यासोबतच धुळे तालुका देखील कोरडा राहिल्याने ग्रामीण भागात शेती पिकांचे नुकसान टळले़ दरम्यान, महापालिकेच्या शाळा क्रमांक ३ मधील काही वर्गखोल्यांचे पत्रे उडाले़ सुदेवाने यात जीवितहानी झाली नाही़ २० मिमीची पावसाची नोंद करण्यात आली़
गुरुवारी सकाळपासूनच तसे ढगाळ वातावरण होते़ अचानक दुपारी दीड वाजेच्या सुमारास वातावरणात बदल झाला़ दुपारी २ वाजेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली़ अवघ्या काही वेळात हलक्या कोसळणाºया सरींनी रौद्र रुप धारण केले आणि पंधरा मिनीटे दमदार पावसाने हजेरी लावली़ यावेळी वाराही वाहणे तसे बंदच झाले होते़
व्यावसायिकांची धावपळ
दुपारी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे हंगामी व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडाली होती़ भाजीपाल्यासह फळ विक्रेत्यांनी नुकसान होऊ नये म्हणून प्रयत्न केले़ तर काहींनी रस्त्याच्या अडोश्याला जाणे पसंत केले़
बाजार समितीत नुकसान
धुळ्याच्या बाजार समितीत आजुबाजुच्या ग्रामीण भागासह नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा, मका येण्यास सुरुवात झाली आहे़ गुरुवारी बाजार समितीत २ हजार ५०० गोणी कांद्याची तर १ हजार ९०० ते २ हजार गोणी मका दाखल झालेला होता़ अचानक आलेल्या पावसामुळे कांदा आणि मका वाचविण्याची धडपड शेतकºयांनी केली़ ज्या मालाची व्यापाºयांकडून खरेदी झाली होती तो माल खराब होऊ नये यासाठी व्यापाºयांनी देखील पुढाकार घेऊन कांदा आणि मका वाचविण्यासाठी पुढाकार घेतला़ या दोन्ही पिकांचे लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज बाजार समितीच्या सुत्रांनी व्यक्त केला़
पोल वाकले, फांद्या तुटल्या
बेमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली़ सुरुवातीला वादळीवारा झाला नाही़ परंतु पाऊस थांबण्याच्या शेवटच्या टप्प्यात जोरदार वादळीवारा झाला़ त्याचा परिणामी मालेगाव रोडवरील विद्युत पोलवर झाला़ अग्रसेन चौकाच्या पुढे रस्त्याच्या मधोमध असलेले दोन विद्युत पोल वाकल्याने विजेचा प्रवाह खंडीत करावा लागला़ विज कंपनीकडून या भागात
विजेचा लंपडाव
केवळ १५ मिनीटांच्या पावसात विजेचा प्रवाह खंडीत झाला होता़ वीज सारखी ये-जा करीत होती़
जिल्ह्यात कुठेही पाऊस नाही
बेमोसमी पावसाने केवळ धुळ्यातच हजेरी लावली आहे़ साक्री, पिंपळनेरसह पश्चिम पट्टा, शिरपूर शहर आणि तालुका तसेच शिंदखेडा आणि संपुर्ण तालुक्यात पावसाचा एक थेंबही पडला नाही़ धुळे तालुक्यातील वडजाई वगळता कापडणे, सोनगीर या भागातही पावसाने हजेरी लावलेली नव्हती, अशी माहिती आमच्या प्रतिनिधींनी दूरध्वनीवरुन दिली़ त्यामुळे ग्रामीण भागात शेतीचे आणि घराच्या नुकसानीचा काहीही संबंध येत नाही़
वडजाईत वादळी वाºयासह दमदार पाऊस
वडजाई : धुळे तालुक्यातील वडजाई परिसरात अचानक वातावरणात बदल होऊन अवघ्या पंधरा मिनिटात तुफानी वादळी वाºयासह गारांच्या पावसाला सुरुवात झाली. त्यात गावातील अनेक झाडांच्या फांद्या, इलेक्ट्रीक तारा पोलवर पडल्यामुळे गावात आठ पोल वाकुन तारा तुटल्याने त्या घरावर पडल्या़ तर फागणे रस्त्यावरील मेन लाईनचे अनेक पोल वाकले आहेत़ त्यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले़ सदर नुकसानीचे वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी एऩ बी. गांगुर्डे, दीपक शिरसाठ यांनी गावात तुटलेल्या तारा, पोलसह नुकसानीची पाहणी केली़ नुकसान मोठे असल्यामुळे विद्युत प्रवाह बंद करण्यात आला आहे़ या वेळी गावातील संपुर्ण तारा जीर्ण झाल्या आहेत. गेल्या साठ वर्षापासुन त्या बदललेल्या नाहीत़ त्या नवीन बदलण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली़