२०१९ पर्यंत राज्यातील बेघरांना घरे मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 05:53 PM2017-12-08T17:53:48+5:302017-12-08T17:56:26+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिंदखेडा येथील सभेत घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : स्वातंत्र्यानंतर देशात शहरीकरण झपाट्याने झाले. ग्रामीण भागातील जनता रोजगारानिमित्त शहरात स्थलांतरीत झाली. परिणामी बेघर असलेल्यांची संख्या वाढली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ सालापर्यंत बेघरांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे देण्याचे आश्वासित केले आहे. राज्यात २०१९ सालापर्यंत बेघरांना घरे देण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
शिंदखेडा नगरपंचात निवडणुकीनिमित्त स्टेशनरोडवरील कृउबा मैदानात झाली, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, गेल्या ७० वर्षाच्या काळात कॉँग्रेस, राष्टÑवादीने सत्तेचा अनेकदा उपभोग घेतला. मात्र गरिबांची गरीबी दूर केली नाही. पक्षातील लोकांनाच मोठे करण्यात या पक्षांनी धन्यता मानली.मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्यात सत्ता आल्यानंतर विकास कामांना जोरात सुरवात झाली. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन झाले. ई-गव्हर्नर प्रणालीमुळे सर्व सामान्यांची गैरसोय दूर झाली. हे परिवर्तन यापुढेही सुरू राहणार असून भाजपाला जनतेची साथ हवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान कृषी उत्पन्न समितीच्या प्रांगणात झालेल्या सभेला जवळपास ५ हजार नागरिकांची उपस्थिती होती. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती.