बिअरची विनापरवाना वाहतूक; ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:23 PM2019-06-19T22:23:56+5:302019-06-19T22:24:34+5:30
दोन अटकेत : १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
शिरपूर : शिरपूर-शहादा रस्त्यावर गोल्ड रिफायनरीसमोर ट्रकमधून विनापरवाना बिअरचे खोके नेले जात असताना ट्रक अडवून पकडण्यात आला. बुधवारी सकाळी १० वाजता ही कारवाई करण्यात आली.
बुधवारी एम.पी. ०९ जी.जी. ३०५५ क्रमांकाचा ट्रक इंदोर कडून येत होता. तो ट्रक महामार्गावरुन पुलाखालून शहादा रस्त्याकडून शहादा कडे जात होता. सदर ट्रक मध्ये विना परवाना बियर नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी शहादा बायपासवर नाकाबंदी केली होती.
सकाळी दहा वाजता ट्रक आल्यानंतर पोलिसांनी ट्रक थांबवला. ट्रक थांबवून ट्रक तपासला असता ट्रकमध्ये जवळपास ५०० बियरचे खोके आढळून आले. प्रत्येक खोक्यात २४ बियर कँन असा जवळपास एक हजार दोनशे बियर कॅन गाडीत आढळून आले.
या कारवाईत ट्रकसह जवळपास बारा ते पंधरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या प्रकरणी गाडीच्या चालकासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किरण बागुल, समीर पाटील, योगेश कोळी, अमोल पगारे, मुकेश पावरा,अमित रणमळे, स्वप्निल बांगर, महिंद्रा सपकाळ,हारून शेख प्रवीण अमृतकर यांनी केली.