वरला ते आंबा रोडवर गावठी कट्टा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 10:11 PM2019-10-17T22:11:10+5:302019-10-17T22:11:44+5:30
शिरपूर तालुका : चार काडतूसही जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर/पळासनेर : नाकाबंदीच्या काळात शिरपूर तालुका पोलिसांनी वडेल गावाजवळ दुचाकीस्वाराकडून एक गावठी कट्टासह चार जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले़ ही कारवाई वरला ते आंबा रोडवर गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली़
देशी बनावटीचा कट्टा स्वत:च्या कब्जात बाळगून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मध्यप्रदेश राज्यातील वरला येथून शिरपूरकडे येणार असल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली़ त्यानुसार वरला ते आंबा रोडवर असलेल्या वडेल गावात बॉर्डर सिलींग पॉर्इंटच्या राहुटी जवळच नाकाबंदी करण्यात आली़ एमपी ४६ एमबी ६६९३ क्रमांकाची दुचाकी आल्यानंतर अन्य वाहनांप्रमाणे या दुचाकीस्वाराच्या वाहनासह त्याची तपासणी करण्यात आली़ त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या शर्टच्या खाली कमरेच्या उजव्या बाजूला पॅन्टमध्ये एक लोखंडी कट्टा अडकविलेला मिळून आला़ त्याच्याजवळून २० हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, ८०० रुपये किंमतीचे चार जीवंत काडतूस, २० हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण ४० हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़ याप्रकरणी संशयित सतनामसिंग महारसिंग जुनेजा (१९, रा़ उमर्ठी ता़ वरला जि़ बडवानी, मध्यप्रदेश) याच्या विरोधात पोलीस कर्मचारी रामदास बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण गवळी, पोलीस कर्मचारी संजीव जाधव, योगेश दाभाडे, संदिप शिंदे यांनी केली़ संशयित तरुणाला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे़