माहिती अधिकाराचा सद्उपयोग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:55 PM2019-02-24T22:55:53+5:302019-02-24T22:56:19+5:30
चर्चासत्रातील सूर : क्रांती बहुउद्देशीय संस्थेतर्फे उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : माहितीचा अधिकार हा खूप व्यापक आहे़ त्याचा उपयोग न्यायासाठी झाला पाहीजे असा सूर चर्चासत्रातील मान्यवरांच्या मनोगतून निघाला़
बसस्थानकाच्या आवारात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे आणि क्रांती बहुउद्देशीय महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने माहिती अधिकार कायद्यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते़ याप्रसंगी बसस्थानक प्रमुख एम़ ए़ तिवारी, अॅड़ जितेंद्र निळे, अॅड़ अश्विनी पाटील, अॅड़ चंद्रकांत येशीराव, आशा वसईकर आदींची उपस्थिती होती़ अध्यक्षस्थानी अॅड़ डी़ डी़ जोशी उपस्थित होते़
अॅड़ निळे म्हणाले, माहिती अधिकार हा खूप छोटा कायदा असलातरी त्याचे स्वरुप व्यापक आहे़ या कायद्याच्या आधारे कोणीही अन्यायाला वाचा फोडण्याची क्षमता ठेवू शकतो़ दीपावली आणि सण-उत्सवाच्या काळात खासगी प्रवासी वाहनधारकांकडून कशाप्रकारे आर्थिक पिळवणूक करतात, हे स्पष्ट केले़ हा प्रकार सुध्दा एक प्रकारे प्रवाश्यांवर होणारा अन्याय असून या प्रकाराला वाचा फोडणे आवश्यक आहे़
तिवारी म्हणाले, राज्य परिवहन महामंडळामार्फत प्रवाश्यांच्या सोईसाठी आणि प्रवाश्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून प्रवासाचे दर २० ते २५ टक्के कमी करण्यात आलेले आहेत़ प्रवाश्यांची जादा गैरसोय टाळावी यासाठी जादा बसेस सज्ज करण्यात आलेले आहे़ नागरीकांनी त्याचा लाभ घ्यायला हवा़
अॅड़ अश्विनी पाटील यांनी त्यांच्या मनोगतातून माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत आपणास कोणत्या स्वरुपाची माहिती जाणून घेता येते याबाबत वर्गीकरणासह स्पष्टीकरण केले़ माहिती अधिकाराचा अर्ज कशा स्वरुपात भरावा याचे विश्लेषण केले़
अॅड़ जोशी यांनी अध्यक्षीय भाषणातून माहिती अधिकार अधिनियमाचा सद्उपयोग करावा व माहिती अधिकार कायद्याच्या विविध पैलूंबाबत मार्गदर्शन केले़ माहिती अधिकार अधिनियमातंर्गत प्रत्येक व्यक्ती आपले हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी लढा देवू शकते़ यासाठी माहिती अधिकार अधिनियमाचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचेही जोशी यांनी सांगितले़
सुत्रसंचालन तुषार अहिरे यांनी केले़ आभार रुक्मिणी ओझा यांनी मानले़ ईश्वर बारी, भावना क्षीरसागर, अरुण सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, हेमराज साळुंखे, अकबर पिंजारी, विशाल येशीराव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले़